एकीकडे सरकार देशातील दलित जनतेला आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी सर्व पावले उचलत आहे, तर दुसरीकडे गुजरातच्या (Gujarat) मोरबी (Morbi) शहरात दलित व्यक्तीवरील अत्याचाराची एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथे एका महिला व्यावसायिकाने तिच्या एका माजी कर्मचाऱ्यासोबत अतिशय क्रूर व्यवहार केला आहे. हा कर्मचारी महिलेकडे त्याचा पगार मागण्यासाठी गेला असता, संतप्त झालेल्या महिलेने या दलित तरुणाला बेदम मारहाण केली. या सर्व प्रकाराने महिलेचे समाधान झाले नाही, तेव्हा तिने त्या तरुणाला तोंडाने चप्पल उचलण्यास सांगितले. यानंतर महिलेने तरुणाला माफी मागण्यास सांगितले. आता या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी महिला व इतर 6 कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
ए डिव्हिजन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, नीलेश किशोरभाई दलसानिया असे या घटनेतील पीडितेचे नाव आहे. तो उद्योजक विभूती पटेल उर्फ राणी बा हिच्या राणीबा इंडस्ट्रीजच्या निर्यात विभागात 2 ऑक्टोबरपर्यंत कार्यरत होता. त्यानंतर त्याला अचानक 18 ऑक्टोबर रोजी कामावर न येण्यास सांगण्यात आले. त्यानंतर तरुणाने पगारासाठी कंपनीमध्ये फोन केला. जिथे त्याला कार्यालयात येऊन पगार घेऊन जाण्यास सांगण्यात आले.
त्यानंतर पीडित तरुण आपला भाऊ आणि एका शेजाऱ्यासोबत कंपनीत गेला. तिथे या तिघांनाही मारहाण केली गेली. त्यांचे केस पकडून मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पिडीत तरुणाच्या तोंडात जोडा घातला गेला. तेथे उपस्थित लोकांनी या तिघांना जबर मारहाण करून तिथून हाकलून लावले. तक्रारीमध्ये बेल्टने मारहाण केल्याचाही आरोप आहे. नीलेशचा आरोप आहे की, व्यावसायिक महिला विभूती पटेल याने त्याला चप्पल तोंडात घेण्यास भाग पाडले आणि माफी मागण्यास सांगितले. पोलिसात तक्रार केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली. (हेही वाचा: Bihar Forced Marriage: 'महिलेच्या भांगात जबरदस्तीने कुंकू भरणे म्हणजे लग्न नाही, विवाहासाठी सप्तपदी महत्वाची'; Patna High Court चा मोठा निर्णय)
मोरबीचे पोलीस उपअधीक्षक प्रतिपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणाच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, गुरुवारी आरोपींविरुद्ध कलम 323, 504, 506 (2) आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय आरोपींविरुद्ध एससी/एसटी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेशवर सध्या मोरबी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.