Marriage | Representational Image (Photo Credits: Pixabay)

बिहारमध्ये (Bihar) सक्तीच्या लग्नाशी संबंधित एका प्रकरणात पाटणा उच्च न्यायालयाने (Patna High Court) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. महिलेच्या कपाळावर जबरदस्तीने कुंकू (सिंदूर) लावणे हा हिंदू कायद्यानुसार विवाह नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. हीच कृती ऐच्छिक असल्याशिवाय आणि त्यासोबत 'सप्तपदी' (वधू-वरांनी पवित्र अग्नीभोवती सात फेरे घेणे) विधी केल्याशिवाय हिंदू विवाह वैध नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती पीबी बजंत्री आणि अरुण कुमार झा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. यासह खंडपीठाने 10 नोव्हेंबर रोजी सक्तीचे लग्न रद्द केले. या खटल्यातील अपीलकर्ता, रविकांत, जो त्यावेळी सैन्यात सिग्नलमन होता, त्याचे 10 वर्षापूर्वी बिहारच्या लखीसराय जिल्ह्यातून अपहरण करण्यात आले होते आणि त्याला प्रतिवादी वधूच्या कपाळावर सिंदूर लावण्यास भाग पाडण्यात आले होते. हे सर्व बंदुकीच्या धाकावर करण्यात आले.

आता याबाबत पाटणा उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, 'हिंदू विवाह कायद्यातील तरतुदींचा अभ्यास केल्यावर हे स्पष्ट होते की जेव्हा सप्तपदी होते तेव्हाच विवाह पूर्ण होतो. याउलट 'सप्तपदी' पूर्ण झाली नाही तर विवाह पूर्ण मानला जाणार नाही.' या प्रकरणात, अपीलकर्ता 30 जून 2013 रोजी लखीसराय येथील एका मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेला असताना त्याच्या काकासह त्याचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्याच दिवशी रविकांतला प्रतिवादीसोबत लग्न करण्यास भाग पाडले. या लग्नासाठी महिलेवरही जबरदस्ती करण्यात आली.

रवीच्या काकांनी याबाबत जिल्हा पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी त्याचे ऐकले नाही. त्यानंतर रवीने लखीसराय येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याने विवाह रद्द करण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात देखील धाव घेतली, ज्यांनी 27 जानेवारी 2020 रोजी त्याची याचिका फेटाळली. (हेही वाचा: Girl Climbs Mobile Tower Video Viral: बॉयफ्रेंडने दिला धोका, तरुणीचा मोबाईल टॉवरवर चढून 'शोले स्टाईल' ड्रामा; व्हिडिओ व्हायरल)

रवीच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाचे निष्कर्ष सदोष असल्याचे सांगून प्रतिवादीच्या वतीने साक्ष देणाऱ्या पुजाऱ्याला सप्तपदीबद्दल काहीही माहिती नव्हती किंवा लग्न समारंभ कुठ झाला  हेदेखील आठवत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.