CoWIN Portal चे मोठे यश; 20 हून अधिक देशांनी लसीकरण मोहिमेसाठी या पोर्टलचा अवलंब करण्यास दर्शविला रस
CoWIN Portal (Photo Credits: Internet)

केंद्र सरकारने देशातील कोरोना लसीकरण (Covid-19 Vaccine) कार्यक्रमासाठी कोविन (CoWIN) पोर्टल सुरू केले. या कोविन पोर्टलमार्फत लसी घेण्यासाठी नोंदणी केली जाते आणि लसीकरणानंतर प्रमाणपत्रही दिले जाते. जगभरातील 20 हून अधिक देशांसह भारतानेही कोरोना लसीकरण कार्यक्रम सुरू केला आणि आज त्यामध्ये भारत आघाडीवर आहे. आता लसीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कोविन या डिजिटल व्यासपीठाची यशोगाथा भारत इतर देशांसोबत शेअर करणार आहे. 20 पेक्षा जास्त देशांनी लसीकरण मोहिमेसाठी या पोर्टलचा अवलंब करण्यास रस दर्शविला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार 30 जून रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या संयुक्त पुढाकाराने 'कोविन ग्लोबल कॉन्फरन्स' डिजिटल माध्यमाद्वारे आयोजित करण्यात येईल, ज्यामध्ये इतर देशांचे प्रतिनिधीत्व करणारे आरोग्य आणि तंत्रज्ञान तज्ञ सहभागी होतील. सूत्रांनी सांगितले की व्हिएतनाम, पेरू, मेक्सिको, इराक, डोमिनिकन रिपब्लिक, पनामा, युक्रेन, नायजेरिया, संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि युगांडा यांसारख्या अनेक देशांनी आपला कोविड लसीकरण कार्यक्रम चालविण्यासाठी, कोविन तंत्र जाणून घेण्यास रस दर्शविला आहे.

लसीकरण सशक्त समूहाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आरएस शर्मा म्हणाले की, 30 जून रोजी होणाऱ्या कोविन ग्लोबल कॉन्फरन्समध्ये भारत डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून सार्वत्रिक लसीकरणासंदर्भातील अनुभव शेअर करेल. कोविड लसीकरणाची रणनीती, अंमलबजावणी, देखरेख आणि मूल्यांकन यासाठी केंद्रीय आयटी प्रणाली म्हणून को-विन विकसित केले. ते पुढे म्हणाले की, कोविन ही यंत्रणा देशाच्या सर्वसमावेशक लसीकरण मोहिमेची तांत्रिक कणा म्हणून काम करते.