![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/01/2020-01-06-3-380x214.jpg)
जागतिक बाजारात सुरु असलेल्या चढउतारांमुळे आज पेट्रोल डिझेलचे भाव (Petrol Diesel Rate) पुन्हा अनुक्रमे 30 आणि 25 पैशांंनी उतरले आहेत. तर दुसरीकडे सोन्याचे दर (Gold Rate) भारतात दिवसागणिक वाढताना पाहायला मिळतायत. काल राजधानी दिल्ली येथे सोन्याने प्रति 10 ग्राम म्हणजेच एक तोळ्यासाठी 45 हजाराचा भाव पार केला होता. तर चांदीचा भाव (Silver Rate) मात्र काही दिवसांपासून सातत्याने उतरत आहेत. प्रति किलो चांदीच्या मागे तब्बल 710 रुपयांची घसरण झाल्याचे समजत आहे. रशिया (Russia) आणि सौदी अरेबिया (Saudi Arebia) या देशात क्रूड ऑईलच्या किमतीवरून सुरु असणाऱ्या या दर युद्धाने अन्य देशांमध्ये किमती घसरत असल्याचे दिसत आहे. 1991 नंतर पहिल्यांदाच जागतिक बाजारात अशी परिस्थिती उद्भवली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पेट्रोल डिझेलचे दर आज सलग पाचव्या दिवशी उतरले आहेत, दिल्ली मध्ये पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे प्रति लिटर 70.29 रुपये आणि 63.01 रुपयांना विकले जात आहे. तर मुंबईत, पेट्रोल 75.99 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 65.97 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. चेन्नई मध्ये पेट्रोलचे दर 73.02 रूपये आणि डिझेल 66.48 रुपये इतके आहेत. बंगळुरू मध्ये पेट्रोल 72.70 रुपये आणि डिझेल 65.16 इतक्या किमतीने विकले जात आहे.
दुसरीकडे, सोन्याची किंमत मात्र अद्याप उतरण्याची शक्यता कमी आहे, देशाची राजधानी दिल्लीत सोन्याचे प्रति तोळा (10 ग्रॅम) दर 45,063 रुपये झाले. तर चांदीच्या दरात प्रति किलो 710 रुपयांची घसरण झाली असून सध्या चांदीचे दर 47,359 रुपये प्रति किलो झाले आहेत. याआधी हेच दर 48,069 रुपये प्रति किलो होते.
दरम्यान, जागतिक बाजारात मंदी आणि कोरोना व्हायरसचे सावट असल्याने अनेक ठिकाणी व्यापार बुडत आहेत, शेअर बाजारात सुद्धा दिवसागणिक मोठी पडझड होत आहे यामुळे आतापर्यंत 600 कोटीहून अधिक किमतीची गुंतवणूक बुडाली आहे.