हिंदू महासभेला (Hindu Mahasabha) आपली गोडसे ज्ञानशाळा (Godse Gyan Shala) अवघ्या तीन दिवसांत बंद करावी लागली आहे. स्थानिक जिल्हा प्रशासान आणि काँग्रेसह इतर अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांनी या ज्ञानशाळेवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये या ज्ञानशाळेला कुलूप लावावे लागले आहे. हिंदू महासभेने मध्य प्रदेशातील ग्वालियर (Gwalior City) शहरामध्ये गोडसे ज्ञानशाळा या नावाने एक अभ्यास केंद्र सुरु केले होते. हिंदू महासभेचा हा दावा होता की, इथे लोकांना देशभक्ती आणि देशभक्तीसंबंधित गोष्टी सांगितल्या जातील. त्यासोबतच देशाच्या फाळणीबाबतच्या घटनाही इथे सांगितल्या जातील.
हिंदू महासभेने रविवारी ग्वालियर येथील दौलतगंज येथे गोडसे ज्ञानशाळा सुरु केली होती. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसे यांच्या नावाने अभ्यास केंद्र सुरु केल्यामुळे जोरदार वाद निर्माण झाला होता. स्थानिक काँग्रेस नेते आणि इतर काही संघटनांनी हिंदू महासभेच्या नेत्यांवर FIR दाखल करण्याची मागणी केलीहोती.
ग्वालियरचे एडीएम किशोर कन्याल यांनी माहिती देताना सांगितले की,अभ्यास केंद्राची माहिती मिळताच दौलतगंज परिसरात कलम 144 लागू करण्यात आले. कारण परिसरात तणाव निर्माण झाला होता आणि सामाजिक वातावरण बिघडण्याची चिन्हे होती. (हेही वाचा, आजच्याच दिवशी गांधींची हत्या करणाऱ्या 'नथुराम गोडसे'ला झाली होती फाशी; जाणून घ्या काय होती त्याची शेवटची इच्छा)
किशोर कन्याल यांनी पुढे सांगितले की, आम्ही या संदर्भात हिंदू महासभेच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यांना सांगितले की, जेणेकरुन शांतता व सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करु नये. हिंदू महासभेच्या नेत्यांनी पोलिसांना कोणत्याही प्रकारची शांतता भंग होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असा विश्वास दिला. तसेच, सुरु केलेले गोडसे अभ्यास केंद्रही बंद करण्याचे त्यांनी अश्वासन दिल्याचे कन्याल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, हिंदू महासभेचे उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज यांनी म्हले की, अभ्यास केंद्र तर बंद केले. परंतू, त्यांची संस्था देशभक्तीसंदर्भात प्रेरणा देणारे कार्यक्रम आयोजित कर राहील. ज्ञानशाळा उघडण्याचा आमचा उद्देश पूर्ण झाला कारण लोकांना माहिती मिळाली आहे, असेही भारद्वाज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.