SpiceJet व GoAir कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पाठवले बिन पगारी रजेवर; लॉकडाऊनमुळे केली खर्चात कपात
SpiceJet Flight | File Image | (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणू (Coronavirus) संकटाकाळात सुरू असलेल्या लॉकडाऊन (Lockdown) मुळे एअरलाइन्स व्यवसायाची स्थिती अत्यंत खराब होत चालली आहे. 25 मार्चपासून सर्व विमान कंपन्यांची सेवा बंद असून विमाने जमिनीवर आहेत. मात्र कर्मचाऱ्यांचे पगार, देखभाल यासह विविध प्रकारचे शुल्क विमान कंपन्या भरत आहेत. दिवसेंदिवस कंपन्यांवरील हे ओझे वाढत आहे, त्यात विमान सेवा पुन्हा कधी सुरु होणार हे माहित नाही. त्यामुळे विमान कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचा पगार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गो एयर (GoAir), स्पाइसजेट (SpiceJet) आपल्या कर्मचाऱ्यांना बिन पगारी रजेवर पाठवत आहेत.

स्पाइसजेटने आपल्या 50,000 रुपयांपेक्षा जास्त पगार असलेल्या कर्मचार्‍यांना, रोटेशनल बेसिसवर रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या देशात 3 मे पर्यंत देशात लॉकडाऊन आहे, ही स्थिती तीन महिन्यांपर्यंत राहील असे सूत्रांकडून समजत आहे. अशात होणारे नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्या कर्मचाऱ्यांना रजेवर पाठवत आहेत. स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांचा एप्रिलमधील पगार हा त्यांच्या कामाच्या दिवसांनुसार देण्यात येणार आहे.

वाडिया समूहाच्या मालकीची एअरलाइन्स, गो एयरने आपल्या कर्मचार्‍यांना मार्च महिन्यात वेतन न घेता रोटेशन रजेवर जाण्यास सांगितले होते. तसेच त्यांच्या पगारामध्येही कपात करण्याची घोषणा केली होती. आता शनिवारी आपल्या कर्मचार्‍यांना पाठवलेल्या पत्रात गो एअरने सांगितले आहे, 'लॉकडाउन आता 3 मेपर्यंत वाढविण्यात आले आहे. यासह विमानांची उड्डाणेही बंद आहेत, म्हणून आम्ही 3 मे पर्यंत तुम्हाला बिन पगारी रजेवर राहण्यास सांगत आहोत.' (हेही वाचा: लॉक डाऊननंतर विमान सेवा सुरु? Flight Operations बाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे उड्डाण मंत्रालयाचे स्पष्टीकरण)

दरम्यान, गोएअर आणि स्पाइसजेट व्यतिरिक्त इतरही काही विमान कंपन्यांनीही कर्मचार्‍यांना बिन पगारी रजेवर जाण्यासाठी सांगितले आहे. याआधी एअर इंडियाने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी बुकिंग सुरु केले होते, मात्र त्यावर त्यांना सरकारने निर्णय घेतल्याशिवाय कोणत्याही सेवा सुरु न करण्यास सांगण्यात आले.