Flight Operations | File Image | (Photo Credits: IANS)

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने (Ministry of Civil Aviation) हे स्पष्ट केले आहे की, 4 मे पासून विमान कंपनी पूर्ववत करण्याचा आणि त्यासाठी आधीच बुकिंग सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. नागरी उड्डयन मंत्री हरदीप पुरी (Hardeep Singh Puri) यांनी माध्यमांच्या वृत्तानंतर याबाबत ट्विट केले आहे. ते म्हणतात, देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय विमान सेवेचा निर्णय अजून तरी घेण्यात आलेला नाही. सरकारच्या या संदर्भात निर्णय घेतल्यानंतरच विमान वाहतूक कंपन्यांनी पुढील प्रक्रिया सुरु करावी. सध्या लॉकडाऊनमुळे देशातील विमान, रस्ते, रेल्वे वाहतूक पूर्णतः बंद आहे.

शनिवारी, एअर इंडिया  (Air India) 4 मेपासून निवडक देशांतर्गत उड्डाणे सुरू करत आहे आणि त्याची बुकिंग सुरू केली आहे, अशी बातमी आली होती. त्यासोबत 1 जून 2020 पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होतील आणि त्यासाठीच्या तारखांचे बुकिंगही सुरू करण्यात आले असल्याचे समजत होते. मात्र आता यासाठी परवानगी नसल्याचे उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आणि देशव्यापी लॉकडाऊनमुळे भारतातील हवाई सेवा पूर्णपणे बंद आहेत. लॉकडाऊनमुळे एअर इंडियाने यापूर्वी 14 एप्रिलपर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावरील व्यावसायिक उड्डाणे बंद केली होती, परंतु नंतर ही मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली. परंतु लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविल्यानंतर एअर इंडियाने बुकिंग पुढे ढकलले होते. आता लॉकडाउन कालावधी 3 मे 2020 रोजी संपत आहे, त्यामुळे एअर इंडिया 4 मेपासून उड्डाणे पुन्हा सुरू करणार आहे व त्यासाठी त्यांनी बुकिंग सुरू केले आहे. (हेही वाचा: भारतीय कंपन्या सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्राने उचलले महत्वाचे पाऊल; चीनसह शेजारील देशांकडून येणाऱ्या FDI साठी सरकारची परवानगी आवश्यक)

आता मिळालेल्या नव्या माहितीनुसार, यासंदर्भात मंत्रालयाने कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही. लॉकडाऊन संपल्यानंतर यासंदर्भात विचार करून मंत्रालय आपला निर्णय जाहीर करणार आहे. हा निर्णय झाल्यानंतरच त्यासंदर्भात बुकिंग करण्याचा निर्णय घ्या असे निर्देश विमान कंपन्यांना दिले गेले आहेत.