Goa CM Pramod Sawant (Photo Credits-ANI)

कोरोना विषाणूची (Coronavirus) दुसरी लाट ओसरत असताना आता अनेक राज्यांमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता आणली गेली आहे. सध्या पावसालाही सुरुवात झाल्याने साहजिकच लोकांची पावले पर्यटनाकडे वळतात. त्यात गोवा (Goa) हे तर पर्यटकांसाठी खास आकर्षण असते. तुम्हीदेखील सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गोव्याला जायची योजना बनवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी एका खासगी कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जोपर्यंत गोव्यात सर्वांना लसीचा पहिला डोस मिळत नाही, तोपर्यंत राज्यात पर्यटन सुरू करण्याची कोणतीही योजना नाही.

ते पुढे म्हणाले की, आमचे हे लक्ष्य 30 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आहे. गोवा सरकारचा चालू असलेला लस उत्सव 3.0 चे उद्दीष्ट हे राज्यातील सर्व जेष्ठ नागरिकांना 100 टक्के लस देण्याचे आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला पर्यटन उद्योगाशी संबंधित लोकांशी भेट घेतलेल्या सावंत यांनी सांगितले की, पर्यटन सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय 30 जुलैनंतरच घेण्यात येईल.

पर्यटन उद्योगातील स्टेक होल्‍डरनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात, गोव्यातील प्रवेशासाठी प्रोटोकॉलची कडक अंमलबजावणी, पर्यटकांसाठी क्वारंटाईन केंद्रे आणि मार्च 2022 पर्यंत इलेक्ट्रॉनिक नृत्य संगीत यांसारखे कार्यक्रम बंद ठेवण्याची मागणी केली होती. यापूर्वी गोवा पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी सांगितले होते की, राज्यात लसीचे दोन्ही डोस दिल्यानंतरच पर्यटन सुरू करावे. तसेच ते असेही म्हणाले होते की, ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत अशाच पर्यटकांना राज्यात प्रवेश द्यावा. (हेही वाचा: मास्क घातला नाही म्हणून पोलिस कॉन्स्टेबलने महिलेवर अनेकदा केला बलात्कार, अशी झाली पोलखोल)

जरी देशात कोरोनाची गती कमी होत असली तरी गोव्यात सध्या 21 जूनपर्यंत कर्फ्यू सुरू आहे. पंचायत व नगरपालिका क्षेत्रात असलेल्या दुकाने सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. 50 लोकांसह विवाहसोहळ्यासाठी परवानगी असणार आहे.