Goa Shocker: गोव्यात कडक उपवास केल्याने दोन भावांचा मृत्यू; दिवसातून खात होते फक्त एक खजूर
Representational Image (File Photo)

गोव्यात (Goa) दोन भावांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घरात त्यांच्यासोबत त्यांची आई बेशुद्धावस्थेत आढळली. या मुलांचा मृत्यू उपासमारीने झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला आपल्या दोन मुलांसह उपवास करत होती. गेल्या अनेक दिवसांपासून ते दिवसातून फक्त एक खजूर खात होते. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूचे संभाव्य कारण 'कॅशेक्सिया आणि कुपोषण' असे सांगितले आहे.

मोहम्मद जुबेर खान (वय 29) आणि त्याचा लहान भाऊ अफान खान (वय 27) अशी मृतांची नावे आहेत. त्यांची आई रुक्साना खान हिच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिचे मानसिक आरोग्य तपासण्यासाठी तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्थेत (आयपीएचबी) पाठवले जाईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 24 एप्रिल रोजी मृतांचे वडील नाझीर खान कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्यांच्या मरगाव येथील घरी पोहोचले होते. त्यांनी दरवाजा ठोठावला मात्र बराच वेळ आतून काहीच प्रतिसाद आला नाही. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला. पोलिसांनी आत दिसले की, एका खोलीत अफान खान पडलेला होता, तर झुबेर खान दुसऱ्या खोलीत जमिनीवर पडलेला होता आणि त्यांची आई बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडली होती. त्यानंतर तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांचे म्हणणे आहे की, मृतदेह पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी असे वाटत होते की त्यांनी बरेच दिवस काहीही खाल्ले नसेल. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता त्यांच्या शरीरात अन्नाचा कणही आढळला नाही. अनेक दिवस अन्न-पाणी न घेतल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले. मिळालेल्या माहितीनुसार, जुबेर, अफान आणि त्यांची आई रुखसाना हे तिघेही अतिशय धार्मिक वृत्तीचे होते आणि याआधी अनेकदा ते उपाशी राहिले आहेत. (हेही वाचा: Committed Suicide : इलेक्शन ड्युटीसाठी मध्य प्रदेश येथे गेलेल्या पोलीस जवानाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या)

नाझीरचा भाऊ अकबर खान यांनी सांगितले की, हे कुटुंब बाहेरच्या जगापासून तुटले होते. ते लोक कोणाशी बोलत नव्हते. रुक्साना आणि तिची मुले गेल्या काही महिन्यांपासून घराबाहेर आले नव्हते. आई आपल्या मुलांकडून कडक उपवास करवून घेत असल्याचेही समोर आले. जुबेरने सावंतवाडी येथे अभियंता म्हणून काम केले होते तर अफानने बी.कॉम. केले होते. दोन्ही भाऊ शिक्षित होते. जुबेर विवाहित असून त्याला दोन मुले आहेत.