गोव्यात राज्याअंतर्गत वाहतूकीला बंदी पण केंद्राने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियमात शिथीलता- मुख्यमंत्री प्रमोद सावंत
प्रमोद सावंत (Photo Credits-ANI)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने येत्या 30 जून पर्यंत देशव्यापी लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे नुकतेच केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. परंतु लॉकडाऊन 5.0 ची घोषणा केल्यानंतर त्यांनी नवी मार्गदर्शक सूचना सुद्धा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार नागरिकांना सेवासुविधांचा लाभ घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण टप्प्याटप्प्यानुसार काही गोष्टी सुरु करण्यात येणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे. तर गोव्यात सुद्धा केंद्र सरकारने जाहीर करण्यात आलेल्या सुचनांनुसार नियमात शिथीलता आणण्यात येणार आहे. मात्र गोव्यात राज्याअंतर्गत वाहतूकीसाठी बंदी असणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

गोव्यात अचानकपणे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने प्रशासनामुळे खळबळ उडाली होती. सध्या गोव्यात 60 हून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गोव्यात सर्वोतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. प्रमोद सावंत यांनी असे ही म्हटले आहे की, मंत्रिमंडाळाच्या आजच्या बैठकीनंतर काही गोष्टीसंदर्भातील सुद्धा निर्णय घेण्यात येणार आहेत. यापूर्वी गोव्यात जिम सुरु करण्यात यावे असे नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली होती.(Unlock 1: तीसऱ्या टप्प्यातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे, मेट्रो रेल, सिनेमा हॉल, जिम, जलतरण तलाव सुरू करण्यासंदर्भात सरकार निर्णय घेणार)

रविवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार गोव्यात कोरोनाबाधित रुग्ण 71 असून त्यापैकी 27 जणांवर अद्याप उपचार सुरु आहेत. तसेच 44 जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली होती. तर देशभरात कोरोना व्हायरसचे 190535 रुग्ण आढळून आले असून 5394 जणांचा बळी गेला आहे. तसेच 93322 जणांवर अद्याप उपचार सुरु असून 91819 जणांची प्रकृती सुधारली आहे.