मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्याची राजधानी असलेल्या भोपाळ शहरातील चुनाभट्टी (Chunabhatti) येथील एका महिलेने आपल्या डॉक्टर पतीवर (Doctor Husband) गंभीर आरोप केला आहे. या महिलेने आरोप केला आहे की, तिचा पती समलैंगिक (Gay Husband) आसून, तो तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडतो. या महिलेने माधौगढ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, पतीचे नाव अभिनीत गुप्ता असे आहे. तो पॉयजन एंटी एजिंग स्किन क्लीनिक चालवतो. डॉ. गुप्ता हा क्लिनीकच्या आडून पब, जिम, वेश्या व्यवसाय आणि नकली औषध विक्री असे व्यवसाय करतो, असेही या महिलेने पतीविरोधात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
आपल्या तक्रारीत महिलेने पुढे म्हटले आहे की, डॉ. गुप्ता याने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला. तक्रारदार महिला आणि आरोपी डॉ. गुप्ता यंचा यंदाच (2019) मार्च महिन्यात भोपाळ येथे विवाह झाला होता. पोलिसांनी म्हटले आहे की, त्यांनी पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन पती डॉ. गुप्ता याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्याला अटक करण्यात येईल.
दरम्यान, पत्नीने पोलिसात दिलेल्या तक्रारीची माहिती मिळताच पती डॉ. अभिनीत गुप्ता याने प्रसारमाध्यमांकडे आरोप केला की, पत्नी आणि तिचे कुटुंबिय हे त्याला सातत्याने पैशांसाठी ब्लॅकमेल करतात. या त्रासाला कंटाळून मी मार्च महिन्यात विवाह झाल्यावर अवघ्या एक महिन्यातच म्हणजे एप्रिल महिन्यात घटस्फोटासाठी न्यायालयाकडे अर्ज केला. (हेही वाचा, Israeli: गे खासदार आमिर ओहाना यांचा बेंजामिन नेतन्याहू यांच्या मंत्रिमंडळात समावेश, कायदा मंत्रालय सांभाळणार)
डॉ. गुप्ता याच्या पत्नीने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, अभिनीत आणि त्याचे कुटुंबीय हे तिच्यावर पैशांसाठी दबाव टाकत होते. त्यांनी तिला माहेरुन 25 लाख रुपये घेऊन येण्यासाठी दबाव टाकला होता. तिने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये अनैसर्गिक कृत्य आणि वेश्या व्यवसायास भाग पाडल्याचा आरोप पतीविरोधात केला आहे. तसेच, पोलिसांकडे नोंदवलेले एफआईआर मध्ये या महिलेने डॉ. गुप्ता याच्याशिवाय तिचे सासरे (डॉ. गुप्ताचे वडील) आणि त्याच्या बहिण तसेच घरातील इतर सदस्यांनाही आरोप केले आहे.