former JNU student Sharjeel Imam Booked by Delhi Crime Branch For 'Cut Assam From India' Remark; 1 crore prize from Hindu leader for beheading

दिल्लीच्या शाहीन बागेत नागरिकता दुरुस्ती कायद्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारा, जेएनयूचा माजी विद्यार्थी शरजील इमामच्या (Sharjeel Imam) अडचणी आता अजून वाढल्या आहेत. शरजील इमामवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. आता त्याला अटक करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत. याबाबत अलिगड एएसपी आकाश कुल्हारी यांनी माहिती दिली. एएनआयशी बोलताना एसएसपी कुल्हारी म्हणाले, 'आम्ही दिल्ली पोलिस आणि बिहार पोलिसांसोबत काम करत आहोत. शरजीलला अटक करण्यासाठी दोन पथके दिल्लीला रवाना झाली आहेत. लवकरच त्याला अटक होईल.'

शाहीनबाग येथे झालेल्या सभेत जेएनयू येथील भारतीय आधुनिक भाषेचा विद्यार्थी, शरजील इमाम याने भाषण केले होते. त्याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये अनेक आक्षेपार्ह आणि दाहक विचारदेखील लिहिले आहेत. सोशल मीडियावरील वादग्रस्त व्हिडिओमध्ये शरजील इमामने आसामला हिंदुस्थानपासून वेगळे करण्याचे सांगितले आहे. तसेच यावेळी तो वादग्रस्त भाषण देताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यावर त्याच्या अटकेची कारवाई केली जात आहे. सध्या शरजील भूमिगत आहे, परंतु पोलिस त्याला पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. (हेही वाचा: इंदौर: झेंडा कोणी फडकवायचा या वादातून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; पहा व्हायरल व्हिडिओ)

शरजीलवर कलम 153 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमामवर आरोप आहे की, त्याने 13 जानेवारी रोजी शाहीन बागेत वादग्रस्त भाषण दिले होते. इमामविरुद्ध दिल्लीशिवाय अलिगड आणि आसाममध्येही एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. दुसरीकडे जो कोणी शरजील इमाम याचा शिरच्छेद करेल, त्यास हिंदूवादी नेते अमित जानी यांनी एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. इमामचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदू संघटनेच्या एका कर्मचार्‍याने अमर कॉलनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.