Kuldeep Singh Sengar (Photo Credits: ANI)

उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी (Unnao Rape Case) न्यायालयाने आज आपला निकाल जाहीर केला आहे. या बाबतीत दोषी ठरविण्यात आलेला आमदार कुलदीपसिंह सेंगर (Kuldeep Singh Sengar), वय -53 याला दिल्लीच्या कोर्टाने जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा सुनावली. त्याला मृत्यूपर्यंत तुरूंगात ठेवले पाहिजे असे कोर्टाने म्हटले आहे. सोबत आरोपीने पिडीतेच्या कुटुंबाला 25 लाख रुपये भरपाई म्हणून द्यावेत असेही न्यायालयाने सांगितले आहे. 2017 मध्ये उन्नाव येथे कुलदीप सेंगर आणि त्याच्या साथीदारांनी मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता.

या घटनेनंतर भाजप पक्षातून कुलदीपसिंह सेंगर याला काढून टाकण्यात आले होते. आज शुक्रवारी कुलदीपसिंह सेंगरबाबतची कारवाई दिल्ली कोर्टात पूर्ण झाली. याआधी सोमवारी न्यायालयाने एक अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी कुलदीपला दोषी ठरवले होते. मंगळवारी शिक्षा सुनावण्याच्या चर्चेदरम्यान, सीबीआयने दोषी आमदाराला जास्तीत जास्त शिक्षा आणि पीडितेला योग्य मोबदल्याची मागणी केली होती. तर सेंगरच्या वकिलांनी, त्याला दोन अल्पवयीन मुली आहेत तसेच यापूर्वी त्याच्यावर कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही. शिक्षा देताना या गोष्टींचा विचार व्हावा असे सांगितले. (हेही वाचा: दिल्ली: उन्नाव बलात्कार प्रकरणात माजी भाजप आमदार कुलदीप सेंगर दोषी; शशी सिंह यांची निर्दोष सुटका)

पीडितेच्या वतीने न्यायालयात दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी असे अपील केले गेले होते. कोर्टाने या प्रकरणातील सहकारी आरोपी शशीसिंह यांची निर्दोष मुक्तता केली व आज कुलदीपसिंह सेंगर याला जन्मठेप सुनावली. 2017 साली या बलात्कारांनंतर सीबीआय तर्फे चार्जशीट दाखल करून एप्रिल 2018 मध्ये कुलदीप सिंह याला अटक करण्यात आली होती. अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला नऊ दिवस वेगवेगळ्या ठिकाणी लपवण्यात आले होते असे तपासात आढळून आले होते. 16 डिसेंबर रोजी दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने सेंगरला पोक्सो कलम 376 आणि कलम 6 अंतर्गत दोषी ठरवले होते त्यानंतर आज शिक्षा सुनावण्यात आली.