Fixed calendar for workplaces: अर्न्स्ट अँड यंग (EY) कंपनीतील 26 वर्षीय महिला कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. कामाच्या तणावामुळे तरूणीचा मृत्यू झाल्याने भारतातील तरूणाईवर कामाचा प्रचंड ताण असल्याचे उघड झाले आहे. नुकतच काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मृत तरूणीच्या वडिलांशी संवाद साधला. त्यावेळी तरूणीच्या वडिलांनी मुलीची कामाच्या ठिकाणी होत असलेली पिळवणूक याविषयी त्यांनी माहिती दिली. त्यावर शशी थरूर(Shashi Tharoor) यांनी तरूणीच्या वडिलांना हा मुद्दा संसदेत मांडणार असल्याचे आश्वसन दिले आहे. (हेही वाचा: EY Pune: कामाचा ताण, नव्या नोकरीत अवघ्या 4 महिन्यात चार्टर्ड अकाउंटंट तरुणीचा मृत्यू; आईचे कंपनीवर गंभीर आरोपांचे पत्र)
यावेळी शशी थरूर यांनी देशातील सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कार्यप्रणालीवरही भाष्य केले आहे. कार्यालयातील असुरक्षित आणि शोषक वातावरणामुळे अण्णा सेबॅस्टियन पेरायल हीचा मृत्यू झाल्याचे ते म्हणाले. देशातील लोकांनी दर आठवड्याला ४० तासांपेक्षा जास्त काम करू नये, अशी सूचना काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी शुक्रवारी केली. मिळालेल्या माहितीनुसार, चार महिन्यांपूर्वी मृत तरूणी EY कंपनीत रुजू झाली होती. तिला दिवसाला 14 तास काम करावे लागले. परिणामी तिची प्रकृती खालावली आणि २० जुलै रोजी तिचा मृत्यू झाला.
धक्कादायक म्हणजे तिच्या अंत्यसंस्कारावेळी तिच्या कंपनीतील कोणी तेथे हजर नव्हते. ही खंत मृत तरूणीच्या आईने एक्सवर पोस्ट करत जाहीर केली. मृत तरूणीच्या वडिलांनी शशी थरूर यांच्याकडे पाच दिवसांचा कामाचा आठवडा आणि ८ तासांची शिफ्ट असावी याचा आग्रह केला. त्यावर ही मुद्दा संसदेत मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.