काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. 2019 मध्ये केरळमधील वायनाडमधून निवडणूक जिंकून ते लोकसभेत गेले होते. शुक्रवार, 24 मार्च रोजी लोकसभा सचिवालयाने अधिसूचना जारी करत त्यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. 2019 मधील मानहानीच्या खटल्यात गुजरातमधील सुरत न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आणि शिक्षेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यापुढे संसदेचे सदस्य नसल्याची घोषणा सचिवालयाने केली.
यावरून देशात राजकीय खळबळ उडाली आहे. या निर्णयावर कडक भूमिका घेत विरोधी पक्षनेत्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील अनेक नेत्यांनी या निर्णयावर कडाडून टीका केली आहे. आता संसदेतून अपात्र ठरल्यानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. लोकसभेचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट केले की, ‘मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे. यासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे.’
लोकसभेचे सदस्यत्व गमावल्यानंतरही आपण घाबरून शांत बसणार नसल्याचे संकेत राहुल गांधी यांनी दिले आहेत. मानहानीच्या प्रकरणात सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्वही संपले. आता लोकसभा सचिवालयाने त्यांचा मतदारसंघ रिक्त घोषित केला आहे. काही दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रेत दिलेल्या भाषणानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना नोटीस देऊन उत्तर मागितले होते.
मैं भारत की आवाज़ के लिए लड़ रहा हूं।
मैं हर कीमत चुकाने को तैयार हूं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 24, 2023
सूरतमधील न्यायालयाने 2019 मध्ये दाखल झालेल्या एका प्रकरणात राहुल गांधींना 'मोदी आडनाव'बद्दल केलेल्या टिप्पणीसाठी गुरुवारी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, जामीन मंजूर करताना न्यायालयाने शिक्षेच्या अंमलबजावणीला 30 दिवसांची स्थगिती दिली होती, जेणेकरून राहुल गांधी या निर्णयाला आव्हान देऊ शकतील. (हेही वाचा: Rahul Gandhi Disqualified As MP: राहुल गांधींची खासदारकी रद्द होताच प्रियंका गांधींनी मांडली घोटाळ्यांची यादी)
दरम्यान, राहुल गांधी हे पंतप्रधान मोदी, भाजप आणि आरएसएसचे जोरदार टीकाकार आहेत. यासोबतच अदानी आणि अंबानींवरही ते निशाणा साधताना दिसले आहेत. यावर सत्य बोलण्याचा फटका राहुल गांधींना सहन करावा लागत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत लढेल, असेही पक्षाने सांगितले आहे. दुसरीकडे वायनाडच्या रिक्त जागेवर निवडणूक आयोग विशेष निवडणूक जाहीर करण्याचीही शक्यता आहे.