Female Prisoners Getting Pregnant: पश्चिम बंगालमधील कारागृहात अनेक महिला कैदी गर्भवती; तुरुंगात 196 मुलांचा जन्म, Calcutta High Court ने घेतली दखल
गर्भवती महिला (संग्रहित संपादित प्रतिमा)

Female Prisoners Getting Pregnant: कोलकाता उच्च न्यायालयात (Calcutta High Court) गुरुवारी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये म्हटले होते की, राज्यातील तुरुंगांमध्ये अनेक महिला कैदी शिक्षा भोगत असताना गर्भवती होत आहेत. एवढेच नाही तर तुरुंगात मुलेही जन्माला येत असून, सध्या 196 मुले पश्चिम बंगालच्या विविध तुरुंगात राहत आहेत. सुधारगृहातील पुरुष कर्मचाऱ्यांना महिला कैद्यांना ठेवलेल्या परिसरात काम करण्यास बंदी घालण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

वकील तपस कुमार भांजा यांना या प्रकरणावर 2018 मध्ये कोर्टाने ॲमिकस क्युरी म्हणून नियुक्त केले होते. त्यांनी सरन्यायाधीश टी.एस. शिवग्ननम यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर महिला कैद्यान्बाबत समस्या आणि सूचना असलेली ॲमिकस क्युरी नोट सादर केली. या नोटमध्ये सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाला विनंती केली होती की, कारागृहातील महिला कैद्यांच्या बंदिवासात पुरूष कर्मचाऱ्यांच्या प्रवेशावर तात्काळ बंदी घालण्यात यावी.

ॲमिकसने असेही सांगितले की, त्यांनी सुधारगृहाला भेट दिली होती जिथे त्यांना  एक स्त्री गर्भवती आढळली. तुरुंगात जन्मलेली 15 मुलेही सुधारगृहात असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य न्यायमूर्ती टीएस शिवग्ननम आणि न्यायमूर्ती सुप्रतीम भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने हा युक्तिवाद गांभीर्याने घेतला आणि पुढील सोमवारी फौजदारी खटल्यांची सुनावणी करणाऱ्या विभागीय खंडपीठासमोर हा मुद्दा ठेवला जाईल, असे सांगितले. या विषयावर नियमित सुनावणी होणार आहे. (हेही वाचा: Mumbai Shocker: 70 वर्षीय महिलेकडील 3 हजार रूपये लुटण्यासाठी तिची दगडाने हत्या; आरोपी अटकेत)

दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अटक केलेल्या महिलेच्या मुलाचे वय 6 वर्षांपेक्षा कमी असेल, तर अशा परिस्थितीत मुलाला तिच्या आईसोबत तुरुंगात राहण्याची परवानगी आहे. मात्र कारागृहातील महिला कैद्यांच्या गर्भधारणेबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.