Sexual Harassment Representational Image (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे सरकारने लॉक डाऊनची (Lockdown) घोषणा केली. यामुळे एकीकडे या विषाणूशी लढण्यास मदत झाली, मात्र दुसरीकडे स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले. आता मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मध्ये अशीच एक संतापजनक घटना घडली आहे. मध्य प्रदेश राज्यातील मुरैना (Morena) जिल्ह्यातील 18 वर्षाच्या मुलीने, तिच्या वडिलांवर लॉकडाऊन दरम्यान दोनदा बलात्कार (Rape) केल्याचा आरोप केला आहे. मुलीने सांगितले आहे की, तिच्या वडिलांनी तिच्यावर 16 दिवसांमध्ये 2 वेळा बलात्कार केला. यामधील सर्वात घृणास्पद गोष्ट म्हणजे, या कृत्यामध्ये मुलीच्या आईनेही आरोपी वडिलांना यात साथ दिली.

मात्र मुलीच्या पालकांनी हे आरोप फेटाळून लावले असून, मुलगी त्यांच्यावर दोषारोप करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दोघेही म्हणाले की, या मुलीच्या एका मुलाशी असलेल्या संबंधाबद्दल आक्षेप घेतल्याने मुलगी त्यांच्यावर खोटे आरोप करीत आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, 26 मार्च रोजी पहिल्यांदा मुलीला शरीरसंबंधाची सक्ती केली गेली. आरोपी वडिलांनी मुलीला पलंगावर बांधले आणि तिच्या आईने तिच्या तोंडात कपड्याचा बोळा घातला. त्यानंतर वडिलांनी मुलीवर बलात्कार केला. या कृत्यानंतर दोघांनीही मुलीला खोलीत बंद केले. (हेही वाचा: लॉक डाऊनमुळे लहान मुलांवरील अत्याचार वाढले; सरकारी हेल्पलाईनवर Child Abuse बाबत 92 हजारपेक्षा जास्त कॉल्स)

यानंतर 10 एप्रिल रोजी मुलगी आपल्या घरातून पळून जाण्यात यशस्वी झाली व ती तिच्या नातेवाईकाच्या घरी पोहोचली. मात्र आरोपी वडिलांनी ती नक्की कुठे आहे हे शोधून काढले आणि तिला परत घरी घेऊन गेले. परत आणल्यानंतर वडिलांनी पुन्हा एकदा या मुलीवर बलात्कार केला. नंतर, मुलीच्या मोठ्या बहिणीने 1098 टोल फ्री नंबरवर संपर्क साधून पीडितेची कहाणी सांगितली. पोलिसांना तपासामध्ये मुलीच्या गालावर चावा घेतल्याच्या खुणा आढळून आल्या, तसेच तिच्या मनगटावरही जखमा होत्या. याबाबत मुरैनाच्या एसपींनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीनंतर पोलिसांनी या पालकांना ताब्यात घेतले आहे व या मुलीचे निवेदन दंडाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात येईल. पोलिसांना सांगितले की ही मुलगी हायस्कूलमध्ये असल्यापासून पिता या मुलीशी छेडछाड करीत होता.