गुजरात हायकोर्टाने (Gujarat High Court) एका प्रकरणात 12 वर्षीय मुलीची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. ही मुलगी बलात्कार पीडित असून ती 28 आठवड्यांची गर्भवती असल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक असे की, तिच्या वडीलांनीच तिच्यावर बलात्कार (Father Rapes Daughter) केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण कोर्टासमोर आल्यानंतर कोर्टाने वडोदरा (Vadodara) येथील सरकारी रुग्णालयात पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात यावे असे आदेश दिले.
पीडितेच्या आईने कोर्टाकडे अर्ज करुन अधिकृतरित्या गर्भपात करण्याची मागणी केली. पीडितेच्या वडिलांना नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाडा पोलिसांनी अटक केल्यानंतर काही दिवसांनी तिने कार्टाकडे धाव घेतली.न्यायमूर्ती समीर दवे यांनी वडोदरा येथील सर सयाजीराव गायकवाड सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षकांना आदेश दिले. सोमवारी दिलेल्या आदेशात निर्देश दिले आहेत की, वैद्यकीय गर्भधारणा कायद्यांतर्गत डॉक्टरांच्या एका पॅनलने मंगळवारी पीडितेची तपासणी करून बुधवारी अहवाल करावा.
नर्मदा जिल्ह्यातील आदिवासीबहुल डेडियापाडा तालुक्यातील गावात राहणाऱ्या पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्याचे आणि परिस्थितीची योग्य प्रकारे काळजी घेण्याचे निर्देशही न्यायालयाने देडियापाडा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना दिले. याचिकाकर्त्याच्या वकिलाने या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. तसेच, पीडितेवर तिच्या वडिलांनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता. तिच्या आईने पोलिसांशी संपर्क साधला होता, त्यानंतर 2 सप्टेंबर रोजी या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला होता. याआधी झालेल्या पीडितेच्या वैद्यकीय तपासणीत ती 27 किंवा 28 आठवड्यांची गर्भवती असल्याचे वकिलाने सांगितले.