आता FASTAG च्या माध्यमातून भरता येणार गाडीत पेट्रोल, जाणून घ्या कसे
Representational Image | File Image | (Photo Credits: Getty Images)

डिजिटल पेमेंटमुळे काही गोष्टी बदलल्या गेल्या आहेत. त्यामुळे आधी आपल्याला पैसे घेऊन कुठेही जावे लागत होते. पण आता डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध असल्याने फक्त एका कार्डच्या माध्यमातून किंवा एका क्यूआर कोडच्या सहाय्याने एखाद्याला पैसे अगदी सहज देता येतात. पण सध्या तुमचा स्मार्टफोनच आता एखाद्या एटीएम सारखे काम करु लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आता तुम्हाला फास्टॅगच्या माध्यमातून पेट्रोल पंपावर इंधन भरता येणार आहे.(SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, लवकरच येणार YONO App चे नवे वर्जन)

सध्या टोल प्लाझावर टोल भरण्यासाठी फास्टॅगचा वापर केला जातो. तसेच काही ठिकाणी फास्टॅगच्या माध्यमातून पार्किंगसाठी सुद्धा पेमेंट केले जात आहे. पण आता पेट्रोल पंपावर पैसे देण्यासाठी फास्टॅगचा वापर केला जाणार आहे. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पैसे नक्की कसे घेतले जाणार किंवा याची प्रक्रिया कशी असेल. तर आम्ही तुम्हाला याबद्दल अधिक सांगणार आहोत.

खरंतर इंडियन ऑइल आणि आयसीआयसीआय बँक तुम्हाला ही सुविधा देत आहे. त्यानुसार तुम्ही इंडियन ऑइलच्या सर्व पेट्रोल पंपावर कॅशलेस आणि कॉन्टॅकलेस पेमेंट करु शकता. आयसीआयसीआय बँकेच्या फास्टॅग युजर्सला इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर फास्टॅगच्या माध्यमातूनच पेमेंट करता येईल. त्यावेळी मात्र पेट्रोल भरतानाच फास्टॅगच्या खात्यामधून पैसे कापले जाणार आहेत. इंडियन ऑइलच्या काही रिटेल आउटलेट्सवर याची व्यवस्था करण्यात ही येत आहे.

रिपोर्ट्सनुसार, फास्टॅग पेमेंट करण्यासाठी एक प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. याच्या सुविधेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला प्रथम पेट्रोल पंपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सांगावे लागणार आहे की, तुम्ही फास्टॅगच्या माध्यमातून पैसे भरणार आहात. त्यानंतर तेथील कर्मचारी तुम्हाला तुमच्या कारवर लावण्यात आलेला फास्टॅग स्कॅन करतील आणि तुमचे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला एक ओटीपी येईल. आता ओटीपी पीओेएस मशीनमध्ये टाकावा लागणार आहे. तेव्हाच तुमचे ट्रान्जेक्शन पूर्ण होणर आहे. पेट्रोल पंपावर फास्टॅगचा वापर टोल प्लाझा सारखा नसणार आहे.