Tractor March Today: शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा, सिंघू बॉर्डर उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी; दिल्ली नोएडा सीमेवर पोलिसांकडून अडथळे
Tractor March | (Photo Credits: ANI)

Farmers March Today: भारतीय किसान युनियन (BKU) आणि संयुक्त किसान मोर्चा (SKM) द्वारे आज 'ट्रॅक्टर मोर्चा' (Farmers Tractor March) काढण्यात येत आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नोएडा पोलिसांनी वाहतूक सूचना जारी केली आहे. तसेच, दिल्ली नोएडा सीमेवर मार्गावर अडथळेही उभा केले आहेत. दरम्यान, पोलिसांनी सामान्य प्रवाशांना दिल्ली-नोएडा सीमा भागातून प्रवास करताना वाहूतक इतरत्र वळविण्यात आल्याची माहिती दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, ट्रॅक्टर रॅली दुपारी 12 वाजलेपासून सुरु झाली आहे. ती  दुपारी 4 वाजेपर्यंत चालणार आहे. आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय किसान युनियन यमुना एक्सप्रेस वेवर ट्रॅक्टर मार्च काढणार आहे. जो राबुपुरा येथील मेहंदीपूर ते फलैदा पर्यंत असेल.

मोर्चाला सुरुवात

दरम्यान, ताज्या माहितीनुसार, शेतकरी मोर्चा घेऊन निघाले आहेत. यमुना एक्सप्रेस वे येथून मोर्चाला सुरुवात झाली आहे. नोएडा पोलिसांनी शेतकरी मोर्चा अडवला आहे. शेतकरी मोर्चावर ठाम असून त्यांनी चार तास मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. शेतकरी यमुना एक्सप्रेस वेच्या खालून असलेल्या सर्विस रोडवरुन मोर्चा काढत होते. हा मोर्चा जेवर येथून सबुपुरा पर्यंत नेला जाणार होता. शेतकरी आंदोलकांनी आरोप केला आहे की, शेतकरी आंदोलकांना पाहून इस्टर्न पेरिफल एक्सप्रेसवेखाली पोलिसांनी अधिक मनुष्यबळ तैनात केले आहे. दरम्यान, मोर्चाच्या ठिकाणी शेतकरी पोहोचू लागले आहेत. (हेही वाचा, https://marathi.latestly.com/topic/farmers-protest/)

व्हिडिओ

कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश

मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मोर्चामार्ग परिसरात आणि सीमेवर कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. शिवाय दिल्ली आणि नोएडाच्या मुख्य प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत. यमुना एक्स्प्रेस वे, लुहारली टोल प्लाझा, महामाया फ्लायओव्हर मार्गे ट्रॅक्टर मोर्चा नेण्याचे नियोजन शेतकरी संघटनांनी केले आहे. अपेक्षित वाहतूक व्यत्यय व्यवस्थापित करण्यासाठी, नोएडा पोलिसांनी त्यांच्या रहदारी सूचनांमध्ये रूपरेषा आखली आहे. चिल्ला सीमेवरून दिल्लीकडे जाणारी वाहने गोलचक्कर चौक सेक्टर-१५ मार्गे सेक्टर 14A उड्डाणपुलाचा वापर करू शकतात, तर डीएनडी सीमेवरून येणारी वाहने सेक्टर 18 मधील फिल्मसिटी फ्लायओव्हरमार्गे उन्नत मार्गाचा वापर करू शकतात. त्याचप्रमाणे कालिंदी सीमेवरून वाहने सेक्टर 37 मार्गे महामाया उड्डाणपूलावरुन मार्गक्रमण करू शकतात.

एक्स पोस्ट

यमुना एक्स्प्रेस वे वापरणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्गांचा वापर करून गैरसोय कमी करण्यासाठी मेट्रोचा पर्याय सुचवण्यात आला आहे. विशिष्ट मार्गावरील माल वाहनांना निर्बंधांचा सामना करावा लागेल आणि चालकांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी पर्यायी मार्गांचा विचार करण्याचा सल्ला पोलिसांकडून प्रवासी आणि वाहनचालकांना देण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी काल सिंघू आणि टिकरी सीमेवरील अडथळे दूर केले कारण शेतकऱ्यांनी राष्ट्रीय राजधानीकडे त्यांचा प्रस्तावित मोर्चा थांबवण्याचा निर्णय घेतला. जागतिक व्यापार संघटनेच्या चर्चेतून कृषी क्षेत्राला दूर ठेवण्यासाठी केंद्राने विकसित देशांवर दबाव आणावा, अशी मागणी करत एसकेएमने आज 'डब्ल्यूटीओ सोडा दिवस' पाळण्याची घोषणा केली आहे.