Tractor Parade | (Photo Credit: ANI)

मंजूर केलेले तनही कृषी कायदे (Farm Law 2020) केंद्र सरकारने मागे घ्यावेत या मागणीसाठी आंदोलक शेतकरी आज (26 जानेवारी) Tractor Parade काढत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानी दिल्ला जोडणाऱ्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत तसेच, गाजियाबाद ते दिल्ली (Ghaziabad to Delhi) प्रवेश करण्यासाठी पोलीसांनी नवी नियमावली जारी केली आहे. कोणत्याही सीमेवरुन दिल्लीमध्ये प्रवेश करण्यास परवानगी असणार नाही. याशिवाय आनंद विहार, सूर्य नगर, अप्सरा बॉर्डर आणि भोपुरा बॉर्डर पूर्णपणे बंद आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वजीराबाद रोड, ISBT रोड, GT रोड, पुश्ता रोड, विकास मार्ग, NH-24, रोड नंबर 57 आणि नोएडा लिंक रोड सुद्धा बंद आहे. त्यामळे नागरिकांना या रस्त्यांचा वापर करता येणार नाही. वापर केलाच तर पुढे मार्गक्रमण करता येणार नाही.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी ट्रॅफिक अलर्ट जारी करत म्हटले की, जीटीके रोड, आउटर रिंग रोड, बादली रोड, केएन काटजू मार्ग, मधुबन चौक, कंझावाला रोड, पल्ला रोड, नरेला आणि DSIDC नरेला रोड या ठिकाणीही रस्ते बंद आहेत. जर अत्यावश्यक सेवा अथवा कारण असेल तरच हे रस्ते वापरासाठी खुले आहेत.

दिल्लीच्या सिमेवर देशभरातील प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणा येथील शेतकरी गेले 2 महिने आंदोलन करत आहेत. आंदोलन आणि कृषी कायद्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात 12 वेळा चर्चा झाली. परंतू, सर्वच्या सर्व चर्चेच्या फेऱ्या अयशस्वी झाल्या. त्यामुळे आता या शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टर रॅली (Tractor Rally) काढण्याचा निर्णय घेतला आहे.