Firing | (Photo Credit - X/ANI)

हरियाणा (Haryana Crime) राज्यातील फरीदाबाद (Faridabad News) येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत इयत्ता 12 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या झाली आहे. आर्यन मिश्रा असे त्याचे नाव आहे. गो तस्करी केल्याच्या संशयावरुन कथीत गोरक्षकांकडून (Cow Vigilantism) त्याच्यावर गोळीबार झाला. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. आरोपींनी पाटलाग करुन त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना 23 ऑगस्ट रोजी घडली, जेव्हा आर्यन त्याच्या मित्रांसोबत एका कारमधून प्रवास करत होता. अनिल कौशिक, वरुण, कृष्णा, आदेश आणि सौरव अशी, अटक करण्यात आलेल्या संशयितआरोपींची नावे आहेत.

पीडिताच्या कारचा पाटलाग

आरोपी स्वत:ला गोरक्षक म्हणवून घेतात. आर्यन त्याच्या मित्रांसोबत फिरादाबाद येथे एका कारमधून प्रवास करत असताना आरोपींना तो गोतस्करी करत असल्याचा कथीतरित्या संशय आला. त्यांनी पीडिताच्या कारचा सुमारे 25 किलोमीटरपर्यंत पाटलाग केला. आरोपींनी त्याला कारमधून खेचून मारहाण केली आणि त्याच्यावर गोळीबार केला. एक गोळी त्याच्या छातीत लागली. मित्रांनी त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

गोळ्या झाडून हत्या

फरीदाबादचे सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) गुन्हे, अमन यादव यांनी गोळीबारात सहभागी असलेल्या पाच जणांच्या अटकेची पुष्टी केली. ते म्हणाले, आर्यन मिश्रा नावाच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. ते म्हणाले, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि हत्यार पोलिसांनी जप्त केले आहे. (हेही वाचा, Burger King Murder Case: दिल्ली बर्गर किंग गोळीबाराचे तीनही आरोपी एनकाउंटरमध्ये ठार)

दरम्यान, पोलिसांनी आरोपी आणि कोणत्याही संघटना किंवा गट यांच्यातील कोणताही संबंध नाकारला आहे. हा गुन्हा केवळ संशयातून केला गेला असा पोलिसांना संशय आहे. पीडितेचे वडील सियानंद मिश्रा यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आणि अशा हिंसाचाराची मूळ कारणे शोधण्यात अपयशी ठरल्याबद्दल अधिकाऱ्यांचा निषेध केला. “गाय तस्करीच्या संशयावरून एखाद्याला गोळ्या घालण्याचा अधिकार कोण देते? असा अधिकार मोदी सरकारने दिला असेल तर का? या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. पण आमचा मुलगा गेलाच ना?”, असे ते म्हणाले.

घटनेचा तपास पोलिसांकडून सुरुच आहे. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेल्या वस्तूंसह अटक केलेल्या व्यक्तींना कोठडीत पाठवले आहे. केवळ संशयावरुन एखाद्याला गोळ्या घातल्या जाव्या याबाबत आश्चर्यय व्यक्त केले जात आहे. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.