प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

आता आपल्या उत्पादनासंबंधी खोटे किंवा पैसे देऊन रिव्ह्यूज लिहिणाऱ्या कंपन्यांवर चाप बसू शकते. ऑनलाइन शॉपिंग, हॉटेल बुकिंग, ट्रॅव्हल बुकिंग, रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ आणि अशा सेवेशी संबंधित कोणत्याही उत्पादनाबद्दल खोटे रिव्ह्यू लिहिणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. भारतीय मानक ब्युरो (BIS) ने कोणत्याही वस्तू किंवा सेवांचे रिव्ह्यूज लिहिण्यासाठी काही मानके निश्चित केली आहेत.

ही मानके जाहीर करताना केंद्रीय ग्राहक मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार म्हणाले की, सुरुवातीला ही सर्व मानके ऐच्छिक असतील. परंतु आम्ही अपेक्षा करतो की कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांचे रिव्ह्यूज लिहिताना या मानकांचे पालन करावे. परंतु त्यानंतरही काही तक्रारी आल्यास ही मानके अनिवार्य केली जातील. रोहित कुमार म्हणाले की, भारत हा असा पहिला देश ठरला आहे, ज्याने उत्पादन किंवा सेवांचे रिव्ह्यूज लिहिण्यासाठी मानके तयार केली आहेत.

त्यांनी आशा व्यक्त केली की या मानकांच्या अंमलबजावणीनंतर, ई-कॉमर्स कंपन्या यापुढे बनावट आणि सशुल्क रिव्ह्यूज करू शकणार नाहीत. ग्राहक सचिव म्हणाले की, रिव्ह्यूजसाठी सर्व पॅरामीटर्सचे अनुसरण करून, कंपनीला बीआयएसमध्ये पडताळणीसाठी अर्ज करावा लागेल. यानंतर बीआयएस प्रमाणपत्र जारी करेल. यानंतर कंपनी आपल्या वेबसाइटवर त्यांचा उल्लेख करू शकेल. ते पुढे म्हणाले की रिव्ह्यूच्या आधारे कंपनीने उत्पादनाला स्टार कसे दिले हे सांगणे बंधनकारक असेल.

जर एखाद्या कंपनीने मानकांचे पालन केले नाही आणि बनावट रिव्ह्यूजद्वारे वस्तू विकण्याचा प्रयत्न केला, तर ते प्रकरण अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसच्या कक्षेत येईल. यासाठी कंपन्यांना दंड होऊ शकतो. जर एखाद्या कंपनीने एखाद्या उत्पादनाबाबत ग्राहकांचे वाईट रिव्ह्यू वेबसाइटवर टाकले नाही, तर ग्राहक हेल्पलाइन आणि अन्य माध्यमातून तक्रार करू शकतात. (हेही वाचा: वर्षाला 8 लाख उत्पन्न असलेल्यांना 0 टॅक्स? EWS Criteria वर Tax Exemption मिळवण्यासाठी Madras High Court मध्ये याचिका)

दरम्यान, एप्रिल ते ऑक्टोबर या काळात ग्राहक हक्कांशी संबंधित तक्रारींमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. यामध्ये ई-कॉमर्स कंपन्यांविरोधातही मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. त्यामुळे सरकारने उत्पादनांच्या रिव्ह्यूजसाठी मानके निश्चित केली आहेत. ई-कॉमर्स वेबसाइटवर उत्पादनाला स्पर्श करण्याचा आणि प्रत्यक्षात पाहण्याचा पर्याय नाही. अशा परिस्थितीत, बहुतेक ग्राहक हे उत्पादनासंबंधी रिव्ह्यूजवर अवलंबून असतात. म्हणून, ऑनलाईन खरेदीमध्ये रिव्ह्यूज महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.