File image of Arnab Goswami, Mumbai Police Commissioner Parambir Singh | (Photo Credits: PTI/YouTube Screengrab)

आजकाल देशात कोणत्या बाबतीत घोटाळे (Scam) होतील काही सांगता येत नाही. आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) वाहिन्यांच्या टीआरपी घोटाळ्याबाबत (TRP Scam) एक धक्कादायक माहिती उघड केली आहे. काही वाहिन्या पैसे देऊन लोकांच्या घरात आपल्या वाहिन्या चालवत होत्या. या घोटाळया प्रकरणी रिपब्लिक टीव्हीसह (Republic TV) तीन वाहिन्यांचा तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह (Param Bir Singh) यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. आता याबाबत रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांनी आपले निवेदन जारी केले आहे. यामध्ये पोलीस आयुक्तांनी लावलेले सर्व आरोप खोटे असल्याचे गोस्वामी यांनी म्हटले आहे.

वाहिनीच्या ट्वीटरद्वारे त्यांनी हे निवेदन जारी केले आहे. यामध्ये ते म्हणतात, ‘मुंबई पोलिस कमिशनर परमवीर सिंह यांनी केलेले सर्व आरोप पूर्णतः चुकीचे आहेत. रिपब्लिक टीव्हीने त्यांना सुशांत सिंह प्रकरणाबाबत प्रश्न विचारल्याने त्यांनी हे आरोप केले आहेत. परमवीर सिंह यांच्याविरुद्ध आम्ही बदनामी केल्याप्रकरणी फौजदारी खटला दाखल करणार आहोत. रिपब्लिक टीव्हीचे नाव असणारा असा एकही बार्क अहवाल नाही. भारतीय लोकांना सत्य माहित आहे. सुशांत सिंह राजपुत प्रकरणात परम बिर सिंह यांचा तपास योग्य नाही. सुशांत सिंह राजपुत प्रकरण, पालघर प्रकरण किंवा इतर कोणत्याही केसबाबत रिपब्लिक टीव्हीने केलेल्या रिपोर्टिंगमुळेच हे आरोप केले गेले आहेत.’

पुढे ते म्हणतात. ‘आम्हाला मुद्दाम लक्ष्य केले जात आहे व त्यामुळे आता आम्ही सत्य लोकांसमोर आणण्यासाठी अजून जोमाने प्रयत्न करणार आहोत. परम बीर सिंह यांनी आज चुकीची माहिती लोकांसमोर मांडली. बार्क अहवालमध्ये आमच्या वाहिनीचे नाव नसल्याने परम बीर सिंह यांनी अधिकृतरीत्या आमची माफी मागावी व कोर्टात आमच्याशी सामना करण्यासाठी सज्ज राहावे- अर्णब गोस्वामी’

दरम्यान, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह म्हणाले की, मुंबई क्राईम ब्रांचने नवीन रॅकेट उघड केले आहे, ज्याचे नाव 'फॉल्स टीआरपी रॅकेट' असे आहे. या रॅकेटमुळे खोट्या टीआरपीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळविला जात होता. या प्रकरणात, पोलिस आयुक्तांनी रिपब्लिक टीव्हीला बनावट टीआरपीचा थेट आरोपी संबोधले आहे. त्यांनी पैसे देऊन आपले रेटिंग वाढवले असल्याचा आरोप रिपब्लिक टीव्हीवर केला आहे.रिपल्बिक टीव्ही चॅनमध्ये काम करणारे लोक, प्रमोटर आणि डायरेक्टर यांचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: खोट्या टीआरपी रॅकेट प्रकरणी दोन जणांना अटक; रिपब्लिकन चॅनलेचे नाव तपासात पुढे आल्याची मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची माहिती)

मुंबई पोलिसांना ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स सिनेमा’ या आणखी दोन वाहिन्यांची माहिती मिळाली आहे. या वाहिन्या पैसे देऊन लोकांच्या घरात आपल्या वाहिन्या चालवत होत्या.