Representational Image (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आग्रा (Agra) येथील एका कॉलेजची नोटिस सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 14 फेब्रुवारी पर्यंत प्रत्येक मुलीला एक प्रियकर असावा, असे यात म्हटले आहे. विशेष म्हणजे बॉयफ्रेंड नसलेल्या मुलींना कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असंही या नोटीसीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. ही नोटीस सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कॉलेजच्या लेटर हेड वर असणाऱ्या या नोटीसीवर कॉलचे सहाय्यक डीन अशिष शर्मा यांची स्वाक्षरी देखील आहे. दरम्यान, यासंदर्भात आता कॉलेजच्या मुख्यध्यापकांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

St. John's College असे या कॉलेजचे नाव असून हे आग्रा येथील सर्वात जुन्या शैक्षिणक संस्थांपैकी एक आहे. 1850 मध्ये ब्रिटिशांनी बांधलेल्या या कॉलेजला दीडशे वर्षांहून अधिक मोठी शैक्षणिक परंपरा आहे. त्यामुळे या कॉलेजच्या नावाने व्हायरल होणारी ही नोटीस धक्कादायक आहे. दरम्यान, सेंट जॉन्स कॉलेजच्या लेटरहेड वर ही नोटीस पाहायला मिळत आहे. त्यावर 14 जानेवारी 2021 ही तारीख लिहिण्यात आली आहे. पुढे त्यात असे म्हटले आहे की, 14 फेब्रुवारीपर्यंत कॉलेजमधील सर्व मुलींना किमान एक प्रियकर असणे बंधनकारक करण्यात आलं आहे. मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. मुलींना एकट्याने कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. प्रियकरासोबतचा फोटो पाहिल्यावरच कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात येईल.

दरम्यान, या व्हायरल नोटीसीनंतर कॉलेजचे मुख्याध्यापक एस. पी. सिंग पत्रक जारी करत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यात त्यांनी म्हटले की, कॉलेज प्रशासनाच्या नावाने खोटी माहिती पसरवणारं पत्रक व्हायरल केल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. कॉलेजचं नाव खराब करण्याच्या उद्देशाने हे केलं जात असून ही नोटीस पूर्णपणे खोटी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यींनी त्याकडे दुर्लक्ष करावं. तसंच यासाठी कोण जबाबदार आहे, हे शोधण्यासाठी कॉलेज चौकशी करत आहे, असंही ते म्हणाले. विशेष म्हणजे आशिष शर्मा नावाचे कोणतेही प्राध्यापक आपल्या कॉलेजमध्ये नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या सर्व प्रकराची माहिती कॉलेजच्या विद्यार्थींनींना व्हॉट्सअॅपद्वारे मिळाली असून त्यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे.