EPFO Interest Rate (फोटो सौजन्य - Edited Image)

EPFO Interest Rate: नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2024-25 या आर्थिक वर्षासाठी पीएफवर 8.25 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने गेल्या वर्षीचा व्याजदर कायम ठेवला असून त्यात कोणताही बदल केलेला नाही. हे सलग दुसरे वर्ष आहे जेव्हा व्याजदर 8.25% वर स्थिर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता 7 कोटींहून अधिक पीएफ खातेधारकांना गेल्या वर्षीइतकेच व्याज मिळणार आहे.

फेब्रुवारी 2024 मध्ये, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2023-24 साठी EPF वरील व्याजदर किरकोळ वाढवून 8.25 टक्के केला होता. 2022-23 मध्ये हा व्याजदर 8.15 टक्के होता. त्याचप्रमाणे 2020-21 मध्ये हा व्याजदर 8.5 टक्के होता. ईपीएफओच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (सीबीटी) ने शुक्रवारी झालेल्या बैठकीत 2024-25 साठी ईपीएफवर 8.25 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - EPFO Interest Rate: 2022-23 साठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर 8.15% व्याजदर निश्चित)

तथापी, आता सीबीटीच्या निर्णयानंतर, 2024-25 साठी ईपीएफ ठेवींवरील व्याजदर मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जाईल. सरकारच्या मंजुरीनंतर, 2024-25 साठी ईपीएफवरील व्याजदर सात कोटींहून अधिक ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात जमा केला जाईल.