दुचाकी (संग्रहित संपादित प्रतिमा)

नोएडा (Noida) व उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील विविध जिल्ह्यांचा समावेश असलेल्या दुचाकी बोट घोटाळ्याप्रकरणी (Bike Bot Scam) , काल पोलिस पथकाने छापा (Raid) टाकून मोठ्या प्रमाणात दुचाकी जप्त केल्या आहेत. मेरठ झोनच्या ईओडब्ल्यू टीमने (Economic Offence Wing Team) छापा मारण्यासाठी पाच टीम तयार केल्या होत्या. त्यानंतर मेरठ, हापूर, गाझियाबाद, मुझफ्फरनगर, बागपत जिल्ह्यात छापे मारण्यात आले. सन 2019 मध्ये दुचाकी बोट घोटाळ्याबाबत नोएडा आणि राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 56 एफआयआर (FIR) नोंदविण्यात आल्या होत्या. सरकारच्या आदेशानुसार 14 फेब्रुवारी 2020 रोजी या सर्व प्रकरणांची चौकशी आर्थिक कार्यालय शाखेकडे सोपविण्यात आली.

उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये झालेल्या या घोटाळ्याच्या छाप्यात सुमारे 178 दुचाकी सापडल्या आहेत. या सर्व बाईक्स अनयुज्ड आहेत आणि त्या गर्वित इनोव्हेटिव्ह प्रमोटर (Garvit Innovative Promoters) नावे नोंदणीकृत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मेरठ, हापूर, गाझियाबाद, मुझफ्फरनगर आणि बागपत येथून या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 50 दुचाकी मुजफ्फरनगर, गाझियाबाद येथून 72, हापूर येथून 21, मेरठ येथून 21 आणि बागपत येथून 13 गाड्या मिळाल्या आहेत. आता यूपी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या कोट्यवधी कोटींच्या बाईकबॉट पोन्झी घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे. (हेही वाचा: माजलगाव नगरपालिकेत 5 कोटींचा आर्थिक घोटाळा; भाजपचे नगराध्यक्ष सहाल चाऊससह दोन मुख्यधिकाऱ्यांना अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, संजय भाटी याची कंपनी गर्वित इनोव्हेटिव्ह प्रमोटर्स लि. ने एक योजना सुरू केली होती, ज्यात 62,200 रुपये जमा करुन दुचाकी देण्यास आणि त्या बाईकला टॅक्सी म्हणून चालविण्याकरिता दरमहा 9765 रुपये देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. लाखो लोक आणि फ्रँचायझी या योजनेत सामील झाल्या आणि संजय भाटी यांच्या कंपनीने बाजारातून सुमारे 3000 कोटी रुपये जमा केले. सुरुवातीला काही लोकांना महिन्यानुसार रक्कम देण्यात आली, परंतु काही महिन्यांनंतर कंपनीने पैसे देणे बंद केले आणि ही सर्व रक्कम वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये गुंतवली. त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय भाटी याच्यासह 19 जण तुरूंगात आहेत.

बाइकबोटच्या प्रवर्तकांनी राजस्थान, पश्चिम बंगाल, दिल्ली, महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणा मधील तब्बल 2 ल्कः लोकांना फसवले आहे.