Photo Credit- X

Chinmoy Krishna Das Arrest: बांगलादेशमध्ये शेख हसीना सरकार पडल्यानंतर इस्कॉनचे प्रमुख चिन्मय कृष्ण दास यांना ढाका पोलिसांनी आज अटक(Chinmoy Krishna Das Arrest) केली. ढाका (Dhaka)येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळून त्यांना अटक झाली. त्यावर इस्कॉनने ट्विट करून भारत सरकारकडे (India Govt) मदत मागितली. आता भारत सरकारने ही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. चिन्मय कृष्ण दास यांची अटक आणि जामीन फेटाळल्याबद्दल मोदी सरकारने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू आणि इतर समुदायांवरील वाढत्या हल्ल्यांच्या संदर्भात घडलेल्या या घटनेची भारत सरकारने गंभीर दखल घेतली आहे. बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर कट्टरतावादी घटकांकडून हल्ले झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये हिंदूंची घरे, व्यावसायिक इमारती, कार्यालये यांची जाळपोळ, लूटमार, करण्यात आली.

त्याशिवाय देवतांची विटंबना करण्यात आली, मंदिरांची तोडफोड झाली. या घटनांमधील दोषी अद्याप पकडले गेले नसताना, शांततेत न्याय, हक्कांची मागणी करणाऱ्या एका धार्मिक नेत्यावर आरोप लावले जात आहेत, यावर भारत सरकारने दुःख व्यक्त केले आहे. श्री चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेच्या विरोधात बांगलादेशात शांततापूर्ण निदर्शने होत असतानाही हिंसाचार झाला असल्याचे भारत सरकारने नमूद केले आहे.

अल्पसंख्याकांच्या हक्कांच्या रक्षणासाठी लढणाऱ्या एका शक्तिशाली आवाजाला दाबण्याचा कसा प्रयत्न केला जात आहे, हे या घटनेवरून दिसून येते. बांगलादेशातील हिंदू समुदायाचे नेते चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांच्या अटकेवर परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी गंभीर चिंता व्यक्त केली.

"बांगलादेशमधील अधिकाऱ्यांना हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांच्या शांततापूर्ण संम्मेलन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारांना सुरक्षितता देण्याचे आवाहन करतो, असे भारत सरकारने निवेदनात म्हटले आहे. पोलीस डिटेक्टिव्ह ब्रँचचे प्रवक्ते रेझौल करीम यांनी दास यांना कोणतयाही वॉरंटशिवाय ताब्यात घेतले होते असा आरोप करण्यात येत आहे.