Job प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पीएम मोदी सरकारच्या (PM Modi Government) कार्यकाळात 2014 पासून भारतातील रोजगाराचे प्रमाण (Employment Rate) लक्षणीय वाढले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी गुरुवारी दिली. ते म्हणाले की, देशातील रोजगार गेल्या 10 वर्षात 36 टक्क्यांनी वाढून 2023-24 मध्ये 64.33 कोटी झाला आहे. तर 2014-15 मध्ये ते 47.15 कोटी होते. 2004 ते 2014 या काळात यूपीए सरकारच्या काळात केवळ 2.9 कोटी अतिरिक्त नोकऱ्या निर्माण झाल्या होत्या, तर 2014-2024 या काळात हा आकडा 17.19 कोटींवर पोहोचला आहे.

एका वर्षात (2023-24) मोदी सरकारने देशात सुमारे 4.6 कोटी नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. कृषी क्षेत्राबाबत, मनसुख मांडविया म्हणाले की, यूपीए कार्यकाळात 2004 ते 2014 दरम्यान रोजगारामध्ये 16 टक्क्यांनी घट झाली, तर एनडीएच्या कार्यकाळात 2014 ते 2023 या काळात त्यात 19 टक्क्यांनी वाढ झाली. त्याचप्रमाणे, यूपीए कार्यकाळात, 2004 ते 2014 दरम्यान उत्पादन क्षेत्रातील रोजगार केवळ सहा टक्क्यांनी वाढला, तर एनडीएच्या कार्यकाळात 2014-2023 दरम्यान त्यात 15 टक्क्यांनी वाढ झाली.

यूपीए कार्यकाळात 2004 ते 2014 दरम्यान सेवा क्षेत्रातील रोजगार 25 टक्क्यांनी वाढला होता, तर मोदींच्या कार्यकाळात 2014 ते 2023 या काळात त्यात 36 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मांडविया यांनी असेही सांगितले की, बेरोजगारीचा दर (UR) 2017-18 मधील 6 टक्क्यांवरून 2023-24 मध्ये 3.2 टक्क्यांवर आला आहे आणि रोजगार दर (WPR) 2017-18 मधील 46.8 टक्क्यांवरून 58.2 टक्के झाला आहे. (हेही वाचा: Small Savings Schemes Unchanged: जानेवारी ते मार्च 2025 या काळात अल्प बचत योजनांवरील व्याजदर कसे राहतील? घ्या जाणून)

गेल्या सात वर्षांत म्हणजे सप्टेंबर 1017 ते सप्टेंबर 2024 दरम्यान, 4.7 कोटींहून अधिक तरुण (वय 18-28 वर्षे) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) सामील झाले आहेत. या सात वर्षांत तरुणांच्या रोजगाराच्या दरात 31.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि तरुणांचा बेरोजगारीचा दर 2017-18 मधील 17.8 टक्क्यांवरून 2023-24 मध्ये 10.2 टक्क्यांवर आला आहे.