
जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांच्या राजीनाम्यानंतर आता भारताच्या नव्या उपराष्ट्रपतीच्या निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता पुढील उपराष्ट्रपतीपदाच्या निवडीसाठी प्रक्रिया सुरू झाल्याचं सांगितलं आहे. नियमानुसार आता लवकरात लवकर नवीन उपराष्ट्रपती निवडला जाणार आहे. पाच वर्षांसाठी उपराष्ट्रपतीची नेमणूक केली जाते. जगदीप यांनी त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये दोन वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असताना राजीनामा दिला आहे. पण आता नव्या उपराष्ट्रपतीला मात्र पूर्ण नवा 5 वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे.
आज 23 जुलै दिवशी निवडणूक आयोगाच्या जारी प्रेस नोट मध्ये गृह मंत्रालयाने धनखड यांच्या राजीनाम्याची रीतसर माहिती दिली आहे आणि "निवडणूक वेळापत्रकाची घोषणा... शक्य तितक्या लवकर केली जाईल" असेही नमूद केले आहे. त्यात काही पूर्व-घोषणा उपक्रमांची यादी देण्यात आली होती जी सुरू करण्यात आली आहेत, जसे की संसदेच्या सर्व सदस्यांचा समावेश असलेल्या निवडणूक मंडळाची तयारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांची अंतिम निवड याचा समावेश आहे.
जगदीप धनखड नंतर कोण होणार नवे उपराष्ट्रपती?
जगदीप धनखड नंतर भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या शर्यतीमध्ये अनेक नावं आहेत. बिहारच्या आगामी निवडणूका पाहता मुख्यमंत्री नितेश कुमार यांना उपराष्ट्रपती केले जाऊ शकते. 74 वर्षीय नितीश यांना तिथे तरुण नेत्यांसाठी जागा सोडावी लागू शकते, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे. मनोज सिन्हा आणि व्हीके सक्सेना, हरिभाऊ बागडे यांचीही नावं या शर्यतीमध्ये आहेत.
उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष देखील असतात त्यामुळे सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये राज्यसभेचा कारभार उपसभापती हरिवंश पाहत आहेत. दोन दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला आहे.