Jagan Mohan Reddy (PC - Facebook)

Egg Puff Scandal: आंध्र प्रदेशात सत्ताबदल झाल्यापासून, टीडीपी (TDP) मागील जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) सरकारच्या खर्चाची सतत छाननी करत आहे. याआधी अनेकदा टीडीपीने जगन सरकारवर आर्थिक अनियमिततेचा आरोप केला आहे. आता सीएम जगन यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री कार्यालयाने एग पफवर (Egg Puffs) 3.6 कोटी रुपये खर्च केल्याची बाब समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टीडीपीने आरोप केला आहे की मुख्यमंत्री कार्यालयाने 2019-24 दरम्यान दरवर्षी सरासरी 72 लाख रुपयांचे एग पफ खाल्ले. पाच वर्षांत हा खर्च 3.6 कोटींवर पोहोचला. मुख्यमंत्री कार्यालयाने पाच वर्षांत 18 लाख एग पफ खाल्ल्याचा आरोप आहे. म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयात रोज 993 एग पफ खाल्ले गेले. जगन मोहन सरकारवर लावण्यात आलेल्या आरोपांना 'एग पफ स्कँडल' असे नाव देण्यात आले आहे.

हा कथित एग पफ घोटाळा उघडकीस आल्यानंतर सत्ताधारी टीडीपी आणि वायएसआरसीपी यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. वायएसआरसीपीने एग पफशी संबंधित या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे. वायएसआरसीपीने ट्विट करून या वृत्तांचे खंडन केले आहे. वायएसआरसीपीने लिहिले की, टीडीपी जगन मोहन रेड्डी यांच्यावर मुद्दाम चिखलफेक करत आहे.

आंध्रच्या सीएमओने दररोज 993 एग पफ खाल्ल्याच्या टीडीपीचा आरोप- 

हा घोटाळा पूर्णपणे खोटा असून तो सिद्ध न झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही वायएसआरसीपीने म्हटले आहे. उलट वायएसआरसीपीने आरोप केला आहे की, 2014-19 दरम्यान, चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा नारा लोकेश यांच्या चहा-नाश्त्यावर 8.5 कोटी रुपये खर्च केले गेले. या एग पफ घोटाळ्याबाबत अद्याप कोणताही अधिकृत अहवाल समोर आलेला नाही. मात्र, आरोप-प्रत्यारोपांचा फेरा सुरूच आहे. (हेही वाचा: ‘Jalebi-Kachori’ Fight in Buxar: जलेबी आणि कचोरी न दिल्याने विद्यार्थ्यी संतापले, शिक्षकाला पळवून पळवून मारले, बिहार येथील घटना)

वायएसआरसीपीने एग पफशी संबंधित वृत्तांचे खंडन केले-

दरम्यान, आंध्र प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीने मोठा विजय मिळवून, पाच वर्षांपासून सत्तेत असलेल्या वायएसआरसीपीला सत्तेतून बाहेर काढले होते. सत्तेत आल्यापासून, टीडीपी सरकार हे जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारच्या काळातील कथित अनियमिततेची सतत चौकशी करत आहे. रेड्डी यांनी सरकारी पैशाचा तसेच घर सजवण्यासाठी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अधिकृत जीओ आणि बिले उघड करून रेड्डी सरकारने कोट्यवधी रुपयांची लूट कशी केली, हे दाखवण्याचा टीडीपीचा प्रयत्न आहे.