माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह (Ex PM Dr. Manmohan Singh) यांना काल, रविवारी 10 मे रोजी त्यांना अचानक छातीत दुखू लागल्याने दिल्ली मधील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कार्डिओ-थोरॅसिक वॉर्डमध्ये मनमोहन सिंह यांना निरीक्षणासाठी ठेवले होते. ताज्या अपडेटनुसार आता मनमोहन सिंह यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे. याशिवाय त्यांची ताप व अन्य लक्षणे नाहीत हे पाहण्यासाठी सुद्धा तपासणी केली जात आहे. डॉ. मनमोहन सिंह यांना कित्येक वर्षांपासून हृदयाचे विकार आहेत, यावर औषधोपचार सुद्धा सुरु आहेत, मात्र काल त्यांनी आपल्याला दिलेल्या नेहमीपेक्षा नव्या गोळ्या औषधांचा डोस घेतल्याने त्याचा त्यांच्यावर परिणाम झाला. या औषधांची तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने त्यांच्या छातीत दुखू लागले परिणामी त्यांना एम्स मध्ये रात्रीच दाखल केले गेले.
डॉ. मनमोहन सिंह हे 87 वर्षाचे आहेत, वयोमानानुसार त्यांना अन्यही त्रास आहेत. तर एम्स रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर सुद्धा उपचार सुरु आहेत, अशावेळी सिंह यांच्या प्रकृतीला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे. दुसरीकडे, काल त्यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून अनेक राजकीय मंडळींनी त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत ट्विट केले होते. लवकर प्रकृती सुधारावी अशा सदिच्छा सुद्धा व्यक्त केल्या होत्या.
ANI ट्विट
Former PM&Congress leader Dr Manmohan Singh was admitted to AIIMS for observation&investigation after he developed febrile reaction to new medication.He's being investigated to rule out other causes of fever. He's stable & under care at the Cardiothoracic Centre of AIIMS: Sources pic.twitter.com/0zJD86VZBb
— ANI (@ANI) May 11, 2020
दरम्यान, मनमोहन सिंह हे भारताच्या राजकीय इतिहासातील गाजलेले नाव आहे. काँग्रेसकडून पाच वेळा खासदार व 2004 ते 2014 या काळात पंतप्रधानपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. त्यानंतर मात्र तब्येतीच्या सततच्या तक्रारींमुळे त्यांनी सक्रिय राजकारणातून माघार घेतली होती.