Double Murder in Budaun: प्रेमी युगुलाची बापाकडून हत्या; बदायूं येथील घटना; पोलिसांना ऑनर किलिंग संशय
Kill | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील बदायूं (Budaun News Today) येथे दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. 'ऑनर किलिंग'चा (Honor Killing) हा प्रकार असावा अशी चर्चा आहे. मृतांमध्ये प्रियकर आणि प्रेयसीचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार, ही हत्या मुलीचा वडील आणि त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे. आरोपी आणि त्याच्या कुटुंबाला प्रियकर आणि प्रेयसी असलेले हे युगूल परस्परांना लपून छपून भेटताना मंगळवारी (2 जानेवारी, 2024) आढळून आले. त्यामुळे संतापलेल्या बाप आणि त्यांच्या कुटुंबाने या युगुलावर फावड्याने हल्ला करत दोघांना ठार केले. हत्येबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत. दरम्यान, तरुणाच्या कुटुंबाने तरुणीच्या कुटुंबाविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलीस गुन्हा नोंदवत आहेत.

बिल्सी पोलीस ठाणे हद्दीत घडली घडली

अत्यंत खळबळजनक अशी ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील बदायूं परिसरातील बिल्सी पोलीस ठाणे हद्दीत घडली. मंगळवारी दुपारी साधारण साडेचावर वाजण्याच्या सुमारास हे युगूल परस्परांन भेटले. तरुणाचे वय 20 वर्षे आहे. युवतीचे वय समजू शकले नाही. तरुणीच्या कुटुंबीयांनी या दोघांना एकत्र पाहिले. त्यामुळे चिडलेल्या वडील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या युगुलाला जागीच संपवले. उत्तर प्रदेश राज्यातील गुन्ह्यामध्ये अशा थरारक घटना अनेकदा पाहायला मिळतात. (हेही वाचा, Bihar Disturbing Video: भरदिवसा पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाची चाकूने भोसकून हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद)

युगुलामध्ये दीड वर्षांपासून प्रेमसंबंध

स्थानिक रहिवाशांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, युगुलामध्ये पाठिमागील दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्याची कुणकूण तरुणीच्या घरी लागली होती. कुटुंबीयांनी तरुणीला सदर तरुणापासून दूर राहण्यास सांगितले होते. असे असतानाही लपूनछपून दोघांचे प्रेमसंबंध सुरुच होते. कुटुंबीयांचा तीव्र विरोध असतानाही आपल्या मुलीचे तरुणाशी संबंध असल्याची भावना वडिलांच्या मनात चीड आणत होती. त्यातूनच ते दोघे रंगेहात सापडले. (हेही वाचा, Uttar Pradesh Shocker: निष्काळजीपणा! चुकून बंदूकीतून गोळी सुटली अन् थेट महिलेच्या डोक्याला लागली; अलीगढ येथील पोलिस ठाण्यातील थरार)

वडिलांची पोलिसांसमोर शरणागती

युगुलाची हत्या केल्यानंतर तरुणीच्या वडिलांनी बिल्सी पोलीस ठाण्यात जाऊन शहणागती पत्करली. त्यांनी आपल्या कृत्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित आणि पीडिता दोघेही एकाच जातीतील आहेत. दरम्यान, मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ऑनर किलींगचा गुन्हा दाखल केला आहे. बदायूंचे एसएसपी डॉ. ओमप्रकाश सिंह यांनी म्हटले आहे की, मुलाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. दोघांचेही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा आहे.

व्हिडिओ

तरुण तरुणींच्या प्रेमसंबंधामध्ये कुटुंबीयांचा अडथळा अनेकदा येताना दिसतो. यामध्ये कधी सामाजिक प्रतिष्ठा, जात, धर्म, पूर्ववैमनस्य, बदल्याची भावना अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. कोणताही कायदा हत्येसाठी परवानगी देत नाही. नागरिकांनाही याची कल्पना असते तरीही रागाच्या भरात तर कधी कच रचून थंड डोक्यानेही हत्येच्या घटना घडवल्या जातात.