Lopamudra Sinha (संग्रहित संपादित प्रतिमा)

Doordarshan Anchor Faints on Air: देशातील बहुतांश राज्यांमध्ये तापमान वाढत असून उष्णतेमुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पश्चिम बंगालमधील (West Bengal) उष्णतेचा परिणाम आता लोकांच्या आरोग्यावरही दिसून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये शनिवारी (20 एप्रिल 2024) तीव्र उष्णतेच्या दरम्यान लाइव्ह बातम्या वाचत असताना दूरदर्शनच्या अँकर लोपामुद्रा सिन्हा (Lopamudra Sinha) बेशुद्ध झाल्या. सिन्हा या दूरदर्शनच्या पश्चिम बंगाल शाखेत काम करतात. बातम्या वाचत असताना लोपामुद्रा सिन्हा बेशुद्ध झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर सिन्हा यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती फेसबुकवर शेअर केली.

लोपामुद्रा सिन्हा म्हणतात, ‘लाइव्ह न्यूज वाचताना माझे बीपी लक्षणीयरीत्या कमी झाले आणि मी बेशुद्ध पडले. मी खूप दिवसांपासून आजारी आहे. कार्यालयात मला वाटले की थोडे पाणी प्यायल्याने बरे वाटेल. सर्वसामान्यपणे मी कधीही बातम्या वाचताना पाणी पीत नाही, मग ती बातमी 10 मिनिटांची असो किंवा अर्ध्या तासाची. मात्र ज्या दिवशी मी बेशुद्ध पडले त्या दिवशी मी फ्लोअर मॅनेजरकडे बोट दाखवून पाण्याची बाटली मागितली, मात्र बातम्या चालू आल्याने मी पाणी पिऊ शकले नाही,’

पहा व्हिडिओ- 

त्या पुढे म्हणतात, ‘त्यानंतर मला वाटले की मी उरलेल्या चार बातम्या पूर्ण करू शकेन. कसेबसे मी त्यातील दोन पूर्ण केल्या. तिसरी बातमी उष्णतेच्या लाटेबद्दल होती आणि ती वाचताना मला हळूहळू चक्कर येऊ लागली. मला वाटले की मी ती पूर्ण करू शकेन व त्यामुळे मी स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला.  मात्र अचानक मला काहीच दिसेनासे झाले. टेलिप्रॉम्प्टर अंधुक झाला आणि माझे डोळे गडद झाले.’ (हेही वाचा: UP Village Got Tap Water After 76 Years: उत्तर प्रदेशातील 'या' गावाला स्वातंत्र्याच्या 76 वर्षांनंतर मिळाले नळाद्वारे पाणी; गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही)

दरम्यान, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून पश्चिम बंगालमध्ये पारा चढला आहे. येथील वर्धमान जिल्ह्यातील पानागढ येथे राज्याचे कमाल तापमान (42.5 अंश सेल्सिअस) नोंदले गेले आहे, तर भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील दोन ते तीन दिवसांत दक्षिण बंगालच्या इतर भागात आणखी उष्णता वाढेल असा अंदाज वर्तवला आहे. विभागाने येथे उष्णतेच्या लाटेबाबत अलर्टही जारी केला आहे. पश्चिम बंगाल सरकारने उष्णतेच्या लाटेमुळे 22 एप्रिलपासून सरकारी शाळांना सुट्टी जाहीर केली होती.