अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या भारत दौर्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 24 व 25 फेब्रुवारी रोजी ते भारत दौर्यावर येणार आहेत. 24 फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प गुजरातला भेट देतील. ट्रम्प यांचे स्वागत आणि सन्मान करण्यासाठी गुजरात कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही.
अहवालानुसार 24 फेब्रुवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प अहमदाबाद येथे तीन तासांच्या दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी राज्य सरकार 100 कोटींपेक्षा जास्त खर्च करणार आहे. त्यानुसार ट्रम्प यांच्या दौर्याची तयारी जोरात सुरू आहे.
ट्रम्प यांच्या भारत दौर्यासाठी गुजरात सरकार उदारपणे खर्च करत आहे. जगातील सर्वात शक्तिशाली देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतासाठी संपूर्ण अहमदाबाद शहर नवरीसारखे सजविण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या दौऱ्याशी संबंधित उच्चस्तरीय सूत्रांच्या माहितीनुसार, तीन तासांसाठी 100 कोटी रुपये खर्च येणार आहे. एवढेच नाही तर, ट्रम्प यांना अहमदाबादमध्ये झोपडपट्ट्या दिसू नये म्हणून झोपडपट्टयांना झाकण्यासाठी भिंतही बांधली जात आहे.
या भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प 24 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे 22 किमी लांबीचा रोड शो करणार आहेत. या रोड शो दरम्यान, भाजपा कार्यकर्त्यांसह 50,000 हून अधिक लोक दोन्ही नेत्यांना अभिवादन करतील. ट्रम्प आणि मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रथम साबरमती आश्रमात जातील. त्यानंतर हे दोन्ही नेते विमानतळाजवळील इंदिरा ब्रिज, एसपी रिंग रोड मार्गे मोथेरा येथील नव्याने तयार झालेल्या क्रिकेट स्टेडियमवर पोहोचतील. हा संपूर्ण प्रवास मार्ग सजविला जात आहे, दुभाजक रंगविले जात आहेत आणि रस्त्यांच्या दुतर्फा फुले लावली जातील. यासाठी सहा कोटी रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
रोड शो दरम्यान बर्याच ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचेही नियोजन आहे. ज्यावर 4 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे स्वागत करण्यासाठी पैशांची कमतरता भासू नये, असे निर्देश सीएम विजय रुपाणी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर आता अहमदाबाद महानगरपालिका आणि अहमदाबाद नगरविकास प्राधिकरण रस्ते दुरुस्त करून संपूर्ण शहर उज्वल करणार आहेत. यासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. (हेही वाचा: ऐकावं ते नवलचं! डोनाल्ड ट्रम्प यांच्या मार्गातील झोपड्या झाकण्यासाठी अहमदाबाद महापालिकेने बांधली भिंत; पहा फोटो)
या योजनेचा एक भाग म्हणून, 17 रस्त्यांवर गिट्टी व डांबराचे नवीन थर देण्यात आले असून, मोतेरा स्टेडियमचे उद्घाटन झाल्यानंतर विमानतळाकडे जाण्यासाठी 1.5 कि.मी. रस्ता तयार करण्यात येत आहे. या रस्त्यांसाठी 60 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. इतकेच नाही तर 12 ते 15 कोटी रुपये ट्रम्प यांच्या संरक्षणासाठी खर्च केले जातील. मोटेरा स्टेडियमवर आयोजित ‘केम छो ट्रम्प’ कार्यक्रमात भाग घेणार्या 1 लाखाहून अधिक लोकांच्या वाहतूक आणि न्याहारीसाठी 7 ते 10 कोटी रुपये खर्च येणार आहे.