कोलकाता (Kolkata) येथील एका रुग्णालयात डॉक्टरांना केलेल्या अमानुष मारहाणीचा वाद चिघळला असून ज्युनिअर डॉक्टरांनी आंदोलन अद्याप सुरु ठेवले आहे. तर डॉक्टरांना केलेल्या मारहणीचा निषेध म्हणून देशातील विविध राज्यातील डॉक्टरांनीसुद्धा या प्रकरणात सहभाग घेतला आहे. त्यामुळे आज (15 जून) राजधानी दिल्ली मधील एस्म सारख्या सरकारी रुग्णालयासह अन्य 18 रुग्णालयातील डॉक्टर्स आंदोलनात सहभागी होणार आहे. त्यामुळे रुग्णालयातील वैद्यकिय सेवा बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जवळजवळ आंदोलनात 10 हजारापेक्षा जास्त डॉक्टर्स आपली उपस्थिती दर्शवणार आहेत.
फेडरेशन ऑफ रेजिडेंट डॉक्टर्स असोसिएशन यांनी डॉक्टरांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याबाबतची लिखीत स्वरुपातील सूचना उच्च अधिकाऱ्यांना दिली आहे. देशभरातील डॉक्टरांनी पुकारलेल्या आंदोलनाचा परिणाम रुग्णांवर होणार आहे. मात्र दिल्ली मेडिकल असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून 19 जून पर्यंत देशव्यापी संप पुकारणार असल्याचे म्हटले आहे.
तर शुक्रवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी भेटण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र ममता बॅनर्जी यांनी हा प्रस्ताव नाकारला. यापूर्वी कोलकाता हायकोर्टानेसुद्धा ममता बॅनर्जी यांना स्पष्टपणे सांगितले होते की, डॉक्टरांशी बोलून या वादाचे निवारण करावे. परंतु ममता बॅमर्जी यांनी याबद्दल बोलणे टाळले असल्याने आंदोलन अधिकाधिक वाढत चालले आहे.
त्यामुळे ज्युनिअर डॉक्टरांनी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच ममता बॅनर्जी यांना पुढील 48 तासांचा अल्टीमेटमसुद्धा देण्यात आला आहे. या प्रकारामुळे आतापर्यंत 700 डॉक्टरांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे.