स्वस्त विमान कंपनी गो फर्स्टच्या (GoFirst) अडचणी सातत्याने वाढत आहेत. आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान कंपनी गो फर्स्टला पुढील आदेश येईपर्यंत तिकिटांची विक्री त्वरित थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. माहितीनुसार, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने गो फर्स्टला सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह रीतीने काम सुरू ठेवण्यास अयशस्वी ठरल्याबद्दल कारणे दाखवा नोटीसदेखील बजावली आहे.
गो फर्स्टवर एअरक्राफ्ट नियम 1937 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गो फर्स्टची उड्डाणे अचानक रद्द करणे आणि आयबीसी (IBC) अंतर्गत कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रिया सुरू केल्यामुळे, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअरलाइनकडून प्रतिसाद मागितला आहे.
नोटीस मिळाल्यानंतर 15 दिवसांत विमान कंपनीकडून उत्तर मागितले आहे. गो फर्स्टमध्ये एअर ऑपरेटर्स सर्टिफिकेट (AOC) सुरू ठेवण्याबाबत पुढील निर्णय त्यांनी सादर केलेल्या प्रतिसादाच्या आधारे घेतला जाईल. तोपर्यंत गो फर्स्टला तात्काळ प्रभावाने आणि पुढील आदेश येईपर्यंत तिकिटांचे बुकिंग आणि विक्री प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गो फर्स्टने 15 मे पर्यंत तिकिटांची विक्री थांबवली आहे. यासोबतच विमान कंपनीने 12 मे पर्यंत आपली उड्डाणे रद्द केली आहेत. (हेही वाचा: MiG-21 Fighter Aircraft Crash In Rajasthan: भारतीय हवाई दलाचे मिग-21 हे लढाऊ विमान राजस्थानमध्ये कोसळले, पायलट सुरक्षित)
गेल्या आठवड्यात, एअरलाइनने अवेळी इंधन पुरवठ्यामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाचा हवाला देत, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) समोर ऐच्छिक दिवाळखोरी रिझोल्यूशन अर्ज देखील दाखल केला. या याचिकेवर सुनावणी झाली असून निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. याआधी 2 मे रोजी, विमान कंपनीने अचानकपणे सर्व उड्डाणे रद्द केली आणि निधीच्या कमतरतेमुळे ते एअरलाइन ऑपरेट करू शकत नसल्याचे सांगितले.