कोर्ट | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Pixabay)

बेंगळुरूच्या जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने (Bengaluru Consumer Court) अलीकडेच मॅच मेकिंग वेबसाइट दिलमिल मॅट्रिमोनीला (Dilmil Matrimony) एका ग्राहकाला नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. दिलमिल मॅट्रिमोनी एका व्यक्तीला त्याच्या मुलासाठी योग्य वधू शोधण्यात अयशस्वी झाल्याबद्दल, त्यांना एकूण 60,000 रुपये नुकसानभरपाई द्यावी लागणार अआहे. निकालानुसार, मॅट्रिमोनिअल साइट तक्रारकर्त्याला आश्वासन दिलेल्या सेवा प्रदान करण्यात कमी पडली होती. साईटने त्यांच्या जाहिरातीत म्हटले आहे की, ते अगदी प्रामाणिकपणे मॅच मेकिंग सेवा देतात, ज्यामध्ये इच्छुक अर्जदार त्यांची नावे नोंदवू शकतात आणि कंपनी अर्जदाराच्या इच्छेनुसार त्यांच्या डेटावरून संभाव्य लोकांची शिफारस करते. मात्र या प्रकरणात कंपनी तक्रारकर्त्याला एकही प्रोफाइल पाठविण्यात अयशस्वी झाली.

अहवालानुसार, तक्रारकर्ते विजय कुमार यांनी 17 मार्च 2024 रोजी दिलमिल मॅट्रिमोनीच्या कार्यालयाशी संपर्क साधला आणि 45 दिवसांत त्यांच्या मुलासाठी योग्य जोडीदार शोधण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर 30,000 रुपये दिले. त्यानंतर अनेक फॉलोअप घेऊनही आणि त्यांच्या कार्यालयास भेटी देऊनही, वेबसाइटने एकही मॅच दाखवली नाही. त्यानंतर कुमार यांनी कंपनीशी संपर्क साधून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते त्यांना मदत मिळाली नाही. जेव्हा त्यांनी परतावा मागितला तेव्हा कंपनीने अयोग्य भाषा वापरली.

बेंगळुरू ग्राहक न्यायालयाने दिलमिल मॅट्रिमोनीला ठोठावला 60,000 रुपयांचा दंड-

कुमार यांनी 9 मे रोजी वेबसाइटला कायदेशीर नोटीस पाठवून परतावा देण्याची विनंती केली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. यामुळे आपल्याला झालेल्या गैरसोयीबद्दल परतावा आणि अतिरिक्त भरपाईची मागणी करत कुमार यांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. नंतर नोटीस बजावूनही दिलमिल मॅट्रिमोनी मंचासमोर हजर झाली नाही आणि अशा प्रकारे आयोगाने तिच्या अनुपस्थितीत केस चालवली. (हेही वाचा: Barabanki: काय सांगता? कॅनेडियन प्रेयसीला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी व्यक्तीने केला बँक लुटण्याचा प्रयत्न; आरोपीला अटक)

आयोगाने असे मानले की, दिलमिल मॅट्रिमोनी वचन दिलेल्या सेवा प्रदान करण्यात अयशस्वी ठरली, त्यामुळे सेवेत कमतरता आणि अनुचित व्यापार प्रथा निर्माण झाली. त्यामुळे तक्रारदाराला व्याजासह 30,000 परत करण्याचे निर्देश वेबसाइटला दिले. याशिवाय, फोरमने कुमार यांना झालेल्या गैरसोयीबद्दल 20,000 रुपये, मानसिक त्रासासाठी 5,000 रुपये आणि खटल्याचा खर्च भागवण्यासाठी 5,000 रुपये अशी एकूण 30,000 रुपयांची अतिरिक्त भरपाई देण्याचे आदेश दिले.