Shatrughan Sinha on Fuel Price Hike: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे देशात 'हुकुमशाही'; वाढत्या तेल दरावरुन शत्रुघ्न सिन्हा यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र
Shatrughan Sinha | (Photo Credit: Facebook)

ज्येष्ठ अभिनेता आणि राजकिय नेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinh) यांनी देशातील वाढती महागाई, वाढते इंधन दर (Fuel Price Hike) आणि बेरोजगारी अशा विविध मुद्द्यांवरुन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांचा थेट रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी (Shatrughan Sinha on PM Narendra Modi) यांच्यावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारद्वारा देशात 'हुकुमशाही' सुरु आहे, असे सिन्हा यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सिन्हा यांनी आगामी काळात पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केले आहे. सिन्हा यांनी केंद्र सरकारला निरंकूश आणि अहंकारी म्हटले आहे.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सत्ताकाळाचे स्मरण करत शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले की, अटलजींच्या काळात आमच्या जवळ लोकशाही होती. परंतू, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हुकूमशाही वर्तन करते आहे. भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांमध्ये राहिलेले शत्रुघ्न सिन्हा हे वाजपेयी यांच्या कार्यकाळात केंद्रीय मंत्रीही राहिले आहेत. (हेही वाचा, India's Most Powerful People: भारतातील 100 सर्वात शक्तिशाली लोकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल; गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगींचे स्थान कितव्या क्रमांकावर, जाणून घ्या)

शत्रुघ्न सिन्हा 12 एप्रिल रोजी होणाऱ्या पश्चिम बंगाल पोटनिवडणुकीत आसनसोल येथून तृणमूल काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडत म्हटले आहे की, मोदी सरकारचा अहंकार आणि गर्व चुकीचा आहे. केवळ नऊ दिवसात इंधन दर आठ पटींनी वाढले. हा अहंकार नाही तर काय आहे? आपण कधी नऊ दिवसांमध्ये आठ वेळा इंधन दरवाढ झाल्याचे पाहिले आहे काय?