भयावह! तेलंगणामध्ये डेंग्यूमुळे अवघ्या 15 दिवसांत कुटुंबातील सर्व सदस्यांचा मृत्यू; फक्त नवजात अर्भक बचावले
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Pixabay)

हैद्राबाद: तेलंगणामध्ये (Telangana) एका कुटुंबामध्ये डेंग्यूचा (Dengue) असा विळखा पडला की, फक्त 15 दिवसांत संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडले आहे. यामध्ये एक दिलासादायक बाब म्हणजे यामधून फक्त नवजात अर्भक वाचले. बाळाची आई, वडील, बहिण आणि आजोबा यांचा डेंगूमुळे मृत्यू झाला. बुधवारी या कुटुंबातील 28-वर्षीय महिलेने, सोनीने मुलाला जन्म दिला त्यानंतर तिचा मृत्यू झाला. सर्वात प्रथम सोनीचे पती जी.के. राजागट्टू (वय 30 वर्षे) यांना डेंग्यू झाला होता. राजागट्टू हे शिक्षक होते आणि ते मंचेरियल जिल्ह्यातील श्रीश्री नगर येथे राहत होते.

डेंग्यूची लागण होताच हे कुटुंब करीमनगरमध्ये स्थलांतरित झाले. तिथे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना 16 ऑक्टोबरला त्यांचे निधन झाले. यानंतर, राजगट्टू यांच्या आजोबांना (वय-70) डेग्यू झाला. व बघता बघता कुटुंबातील आणखी एका सदस्याचा 20 ऑक्टोबरला मृत्यू झाला. सलग दोन मृत्यूच्या दु:खातून हे कुटुंब अद्याप सावरलेले नव्हते, तोपर्यंत राजागट्टूची 6 वर्षांची मुलगी श्री वर्षिनी हिलाही डेंग्यू झाला. उपचारादरम्यान, 27 ऑक्टोबरला म्हणजे दिवाळी दिवशी तिचा मृत्यू झाला.

या दरम्यान, राजगट्टूची पत्नी सोनी गर्भवती होती. एका पाठोपाठ एक कुटुंबातील या तिन्ही मृत्यूमुळे तिला तीव्र धक्का बसला होता. पण अखेरीस डासांमुळे होणाऱ्या आजाराने तिलाही ग्रासले. त्यानंतर सोनीला चांगल्या उपचारासाठी हैदराबादच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मंगळवारी 28 वर्षांच्या सोनीने एका निरोगी मुलाला जन्म दिला. त्यानंतर बुधवारी (30 ऑक्टोबर) सोनी यांचे रुग्णालयात निधन झाले. (हेही वाचा: Dengue Safety Tips: डेंग्यूचा ताप जीवघेणा ठरण्याआधीच त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी आजमवा या खास टीप्स)

अशा प्रकारे अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीत कुटुंबातील सर्व सदस्यांचा मृत्युं झाला. विशेष म्हणजे तेलंगणा उच्च न्यायालयाने यापूर्वीच राज्य सरकारला इशारा दिला होता आणि राज्यात डेंग्यूच्या धोक्यास आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यास सांगितले.