Delhi Violence: NSA अजीत डोभाल यांना दिल्ली हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्याची जबाबदारी, सरकारचा निर्णय
अजित डोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credits-Getty Images)

राजधानी दिल्लीत (Delhi) नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या  (CAA) विरोधात जोरदार आंदोलन सुरु आहे. तसेच आंदोलनाला आता हिंसाचाराचे वळण लागले असून 18 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. एवढेच नाही तर 10 पेक्षा अधिक जण जखमी झाले असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून आंदोलनाने आक्रमक भुमिका घेतली आहे. बुधवारी गोकुलपुरी परिसरात हिंसाचार झाल्याची घटना घडली आहे. या दरम्यान आंदोलकांनी एका दुकानाला पेटवले. दिल्लीतील सध्याची परिस्थिती पाहता केंद्रातील मोदी सरकारने यावर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल (Ajit Doval) यांच्यावर जबाबदारी सरकारने सोपवली आहे.

रिपोर्टनुसार, सरकारकडून अजीत डोभाल यांना दिल्ली हिंसाचार प्रकरणाची संपूर्ण माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅबिनेट यांना देण्याची जबाबदारी सोपवली आहे. तसेच अजीत डोभाल यांनी मंगळवारी रात्री दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराच्या घटनास्थळी पोहचत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर सीलमपूर येथे उत्तर-पूर्वचे डीसीपी वेद प्रकाश सुर्या यांच्या कार्यालयात बैठक घेतली. तसेच अजीत डोभाल यांनी जवळजवळ 8 किमी पर्यंत दिल्लीचा आढावा घेतला.(CAA Protest: दिल्ली पोलिसांनी जखमी आंदोलकांना मारहाण करत गायला लावलं राष्ट्रगीत Watch Video)

दरम्यान, दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर, चांदपुरसह उत्तर-पूर्व भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे. त्यामुळेच प्रशासनाकडून आंदोलनाला हिंसेचे वळण देणाऱ्या आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला हिंसाचारादम्यान शहीद झालेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांच्या परिवारातील सदस्यांनी आंदोलनाला बसले आहेत. तसेच परिवाराने रतनलाल यांना शहीदाचा दर्जा द्यावा अशी ही मागणी केली आहे.