दिल्ली विद्यापीठात वीर सावरकर यांच्या पुतळ्याची NSUI कार्यकर्त्यांकडून विटंबना, ABVP ने केली कठोर कारवाईची मागणी (Watch Video)
Veer Savarkar Statue Destroyed IN DU (Photo Credits: Twitter)

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) दिल्ली केंद्राने (DUSU) विद्यापीठाच्या कॅम्पस मध्ये वीर सावरकर (Veer Savarkar), नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) व भगत सिंह (Bhagat Singh) यांचे पुतळे असलेला एक स्तंभ उभारला होता, मात्र गुरुवारी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया'(NSUI) च्या कार्यकर्त्यांनी यातील सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे समजत आहे. या संघटनेचा अध्यक्ष अक्षय लाकड़ा (Akshay Lakra) याने सावरकरांच्या पुतळ्याला काळा रंग फासून त्याच्यावर चप्पल मारून आपला रोष व्यक्त केला. या घटनेनंतर ABVP तर्फे संबंधित कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

या संपूर्ण प्रकाराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अक्षय लाकड़ाहा सुरुवातीला बोस व भगतसिंग यांच्या पुतळ्यापाशी जाऊन नमस्कार करतो आणि मग सावरकर याच्या पुतळ्याला घातलेला हार तोडून त्याजागी चप्पलांचा हार घालताना दिसून येत आहे. तसेच 'भगत सिंह अमर रहे, बोस अमर रहे' अशी नारेबाजीही यावेळी करण्यात आली.

पहा हा व्हिडीओ

प्राप्त माहितीनुसार,आरएसएसशी संलंग्न असलेल्या DUSU ने विद्यापीठातील कलाशाखेच्या आवारात या पुतळ्यांची उभारणार केली होती मात्र यासाठी संघटनेने कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी घेतली नव्हती. हीच बाब अधोरेखित करून NSUI च्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. विद्यापीठ ABVP च्या सांगण्यावर काम करत आहे, आणि विद्यापीठ केवळ बघ्याची भूमिका घेत आहे असेही या कार्यकर्त्यांनी म्हंटले होते. तसेच नेताजी बोस व भगतसिंग यांच्यासोबत सावरकरांचा पुतळा बसवू नये अशी मागणी केली होती. याबाबत रीतसर तक्रार करूनही त्यांना 48 तासात कोणतीही दाद न मिळाल्याने त्यांनी अखेरीस या मार्गाने आपला निषेध नोंदवला.

दरम्यान, या घटनेनंतर अनेक राजकीय मंडळींनी आक्षेप घेत कार्यकर्त्यांची ही वागणूक लज्जास्पद असल्याचे म्हंटले आहे तर महाराष्ट्रातून देखील तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. सोलापूर येथील काँग्रेस भवन परिसरात सावरकर प्रेमी कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जोरदार निदर्शनं करण्यात आली.