Representational Image (File Photo)

दिल्लीत (Delhi) एका महिलेने आपल्या प्रियकराची हातोड्याने आणि दगडाने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर तिने स्वत: पोलीस स्टेशन गाठून आपला गुन्हा कबूल केला. तिने सांगितले की, मयत प्रियकर तिचा छळ करायचा तसेच तिला आणि तिच्या मुलांना मारण्याची धमकी देत ​​असे. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन महिलेला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण भालस्व डेअरी इथले आहे. येथे एका 28 वर्षीय महिलेने भालस्व पोलीस  स्टेशन गाठले आणि सांगितले की तिने तिच्या प्रियकराचा दगड, चाकू आणि हातोड्याने वार करून खून केला आहे.

यानंतर पोलीस तात्काळ महिलेने दिलेल्या पत्त्यावर पोहोचले असता त्यांना घराच्या मागील खोलीत तरुणाचा मृतदेह पडलेला दिसला. यासह दगड, हातोडा आणि चाकू घटनास्थळी पडले होते. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या पतीचा 2018 मध्ये मृत्यू झाला होता. तिला चार मुले होती. यामध्ये एक मुलगी आणि तीन मुले आहेत.

पतीच्या निधनानंतर ती मुकुंदपूर येथे राहत होती. गेल्या दोन वर्षांपासून ती मयत प्रियकरासोबत रिलेशनशिपमध्ये होती. तो व्यवसायाने प्लंबर होता आणि विवाहित होता आणि त्याला एक मूल होते. महिलेचा आरोप आहे की, तिचा प्रियकर तिच्यासोबत गैरवर्तन करत असे, तिचा छळ करत असे. तो नेहमी दारू प्यायचा आणि तिला व तिच्या मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या द्यायचा. यामुळे ती खूप घाबरली होती. माहितीनुसार, सोमवारी दुपारी 1.30 वाजता महिलेचा प्रियकर मद्यधुंद अवस्थेत तिच्या घरी आला आणि त्याने तिचा विनयभंग आणि गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. (हेही वाचा: Dhanbad Shocker: सुनेच्या गैरवर्तणुकीचा राग आल्याने सासऱ्याने केली हत्या, मृतदेहाचे अनेक तुकडेकरून नदीत फेकले)

प्रियकराच्या वागण्यामुळे महिला चिडली आणि तिने त्याच्यावर दगड, चाकू आणि हातोड्याने हल्ला केला. त्यामुळे गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. पोलीस क्राईम टीम आणि एफएसएल यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यानंतर बीएनएस कलम 103 (1) (हत्या) अंतर्गत महिलेवर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.