
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय व्हिसा रॅकेटचा पर्दाफाश केला असून चार जणांना अटक केली आहे. बेकायदेशीर पद्धतीने लोकांना परदेशात पाठविण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पोलिसांनी विविध देशांतील तब्बल 80 पासपोर्ट, मोठ्या प्रमाणात बनावट आणि गुन्ह्याची कागदपत्रे, शिक्के आणि लॅपटॉप जप्त केले. गिरीश भंडारी, हिमांशू मेहता, गगन शर्मा आणि रमेश आर्य अशी आरोपींची नावे आहेत.
दिल्लीतील प्रेम नगर, टिळक नगर येथे छापा टाकण्यात आला, यावेळी चार संशयितांना अटक करण्यात आली, ज्यांच्याकडे अनेक पासपोर्ट, फर्जी दस्ताऐवज, चलन, बनावट बँक स्टेटमेंट आणि वेगवेगळ्या फर्म आणि कंपन्यांचे लेटरहेड सापडले. आरोपी व्यक्ती दिल्लीत टूर आणि ट्रॅव्हल व्यवसायाच्या नावाखाली गुन्हेगारी सिंडिकेट चालवत होते. त्यांच्या व्यवसायातील सब एजंट लोकांना परदेशात पाठवण्याचे आमिष दाखवत. व्हिसासाठी ते किमान 6 लाख रुपये आकारत.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तींच्या चौकशीत ते गेल्या 10 ते 12 वर्षांपासून या अवैध व्हिसा व्यवसायात असल्याची माहिती समोर आली आहे. हे जाळे दूरवर आहे आणि हरियाणा, पंजाब आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये पसरलेले आहे. या रॅकेटचे सदस्य संपर्कासाठी आणि हा अवैध धंदा चालवण्यासाठी अत्यंत एनक्रिप्टेड अॅप्लिकेशन्सचा वापर करत होते.
मुख्य आरोपी गिरीश भंडारी हा बेकायदेशीर सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षभरापासून गिरीश भंडारी यांच्याशी संबंधित असलेला हिमांशू मेहता, फ्लाइट आणि हॉटेल बुकिंग, विमा व्यवस्था आणि क्लायंट मीटिंग यासारख्या कामांसाठी जबाबदार होता. तर गगन शर्मा आणि रमेश आर्य यांना गिरीशच्या सूचनेनुसार विविध व्यक्तींकडून रोख रक्कम आणि पासपोर्ट गोळा करण्याचे काम करत असे.