Operation Theatre | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Delhi Man Swallows Coins-Magnets: दिल्लीतील (Delhi) एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी 26 वर्षीय तरुणाच्या पोटातून 39 नाणी आणि 37 चुंबकाचे (Coins and Magnets) तुकडे काढले आहेत. रुग्ण बऱ्याच काळापासून या वस्तू गिळत होता. त्याच्या पोटात प्रचंड दुखू लागल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले. येथे तपासणीदरम्यान पोटात काही विचित्र वस्तू दिसल्या. त्यानंतर काही चाचण्या केल्या असता त्याच्या पोटात नाणी आणि चुंबक आढळले. या तरुणाला बॉडी बनवायची होती. त्यामुळे माहितीनुसार, शरीरातील झिंकचे प्रमाण वाढवण्यासाठी त्याने ही 39 नाणी आणि 37 चुंबकाचे तुकडे गिळले.

अहवालानुसार, तो मानसिक आजारी असून त्याला नाणी खाण्याची सवय असल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. गेल्या 20 ते 22 दिवसांत त्याने 39 नाणी आणि 37 चुंबक गिळले. त्यानंतर त्याच्या आतड्यात अडथळा आला आणि त्याला उलट्या होऊ लागल्या. आता डॉक्टरांनी आतड्यात अडकलेली सर्व नाणी आणि चुंबक बाहेर काढून रुग्णाचे प्राण वाचवले. रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (हेही वाचा: Gurugram Crime: नेपाळी व्यक्तीने पत्नीची गळा दाबून केली हत्या, गुरुग्राम येथील खळबळजनक घटना)

रुग्णालयाचे लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.तरुण मित्तल यांनी सांगितले की, एक्स-रेमध्ये नाण्यांसारख्या गोष्टी दिसल्या. यानंतर रुग्णाच्या पोटाचे सीटी स्कॅन करण्यात आले. त्यात नाणी आणि चुंबकांमुळे आतड्यांतील अडथळे दिसून आले. हे पाहून डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेदरम्यान, चुंबक आणि नाणी लहान आतड्यात दोन स्वतंत्र लूपमध्ये आढळून आली. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून रुग्णाचे पोट फाडून सर्व नाणी बाहेर काढली. या नाण्यांमध्ये एक रुपया, दोन रुपये आणि पाच रुपयांची एकूण 39 नाणी सापडली आहेत. याशिवाय 37 चुंबकही शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्यात आले. उपचारानंतर रुग्णाला सात दिवसांनी रुग्णालयातून सोडण्यात आले.