Delhi Horror: दिल्लीमध्ये 12 वर्षाच्या मुलावर 4 जणांचा सामुहिक बलात्कार; प्रायव्हेट पार्टमध्ये घुसवला रॉड, केली बेदम मारहाण 
Rape Stope | Representational Image (Photo Credits: File Image)

राजधानी दिल्ली (Delhi) हे स्त्रियांसाठी असुरक्षित शहर मानले जाते, तसेच आता ते पुरुषांसाठीही असुरक्षित ठरत असताना दिसत आहे. राजधानीतील सीलमपूर भागात 12 वर्षांच्या मुलावर सामूहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली महिला आयोगाला (DCW) मिळालेल्या तक्रारीत सीलमपूर येथील एका महिलेने सांगितले की, तिच्या 12 वर्षांच्या मुलावर 18 सप्टेंबर रोजी चार लोकांनी क्रूरपणे बलात्कार केला. महत्वाचे म्हणजे, मुलावर सामूहिक बलात्कार करण्याबरोबरच गुन्हेगारांनी त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला आणि त्याला विटा आणि रॉडने बेदम मारहाण केली.

आईने पुढे सांगितले की, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असलेल्या आणि वेदनेने तळमळत असलेल्या मुलाने 22 सप्टेंबर रोजी ही भयानक घटना कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर पालकांनी दिल्ली पोलिसांना माहिती दिली आणि मुलाला रुग्णालयात दाखल केले. सध्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची दखल घेत दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे.

आयोगाने याप्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरची प्रत, अटक करण्यात आलेल्या आरोपींची माहिती, अटक न झाल्यास त्यामागील कारण आणि या संपूर्ण प्रकरणावर केलेल्या कारवाईचा संपूर्ण अहवाल 28 सप्टेंबरपर्यंत देण्यास सांगितले आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र, तीन आरोपी अद्याप फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा: MMS Viral: धक्कादायक! पंजाबनंतर मध्य प्रदेशातील कॉलेजमध्येही एमएमएस प्रकरण, पोलिस तपास सुरु)

दिल्लीत घडलेल्या या घटनेवर स्वाती मालीवाल यांच्या वतीने सांगण्यात आले की, 'दिल्लीत मुलींसोबत मुलेही सुरक्षित नाहीत. एका 12 वर्षीय मुलावर 4 जणांनी अमानुषपणे बलात्कार केला. मुलाला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो आयसीयूमध्ये आहे. आमची टीम सतत कुटुंबासोबत संपर्कात राहून त्यांना मदत करत आहे. आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.’