Delhi Man Stabbed: पार्किंगवरुन झालेल्या किरकोळ वादातून एकाची पत्नी आणि मुलासमोरच चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. ही घटना दक्षिण पूर्व दिल्लीतील सरिता विहार येथे घडली. पीडित व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, शनिवारी (16 सप्टेंबर) रात्री 9.45 च्या सुमारास पीसीआर कॉल आला. फोनवर सांगण्यात आले की, दुचाकीवरुन आलेल्या पाच ते सहा जणांनी अरविंद मंडल यांच्यावर घरात घुसून चाकूने हल्ला केला आहे. पोलिसांनी तातडीने जाऊन पाहणी केली असता अरविंद हे त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हल्लेखोरांनी त्यांची पत्नी आणि मुलासमोरच अरविंद यांच्यावर हल्ला केला.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीत सांगितले की, सायंकाळी अरविंद मंडल हे मुलगा आकाश याच्यासोबत शाळेतून परतत असताना त्यांचा मनोज हलदर नावाच्या व्यक्तीसोबत वाद झाला. दोघांमध्ये मोटरसायकल पार्किंगवरुन जुना वाद होता. दरम्यान, त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला मात्र हे प्रकरण काल सायंकाळीच मिटले. त्यानंतर अरविंद घरी गेले. दरम्यान, रात्री साडेनऊच्या सुमारास सहा जणांचे टोळके अरविंद यांच्या घरी मोटारसायकलवरून पोहोचले. या टोळक्याने त्यांच्यावर व त्यांची पत्नी रेखा मंडल यांच्यासमोर हल्ला केला. यात अरविंद गंभीर जखमी झाला असून उपचारादरम्यान त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला.
पोलिसांनी प्राप्त माहितीच्या आधारे भारतींड दंड संहितेतील विविध कल्मान्वये पाच-सहा जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. राजू पात्रा, रवी उर्फ गोलू आणि शंभू अशी त्यांची नावे आहेत. विजय आणि मनोज हे आणखी दोन आरोपी फरार आहेत. हे सर्वजण सरिता विहार येथील प्रियांका कॅम्प येथील रहिवासी आहेत.