Rajiv Tyagi | ( Photo Credits: Twiiter/ ANI)

काँग्रेस (Congress) प्रवक्त राजीव त्यागी यांचे निधन (Rajiv Tyagi Passes Away) झाले आहे. प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यागी यांना गाजियाबाद येथील यशोदा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कार्डिअॅक अरेस्ट (Cardiac Arrest) आल्याने त्यांचे निधन झाले. काँग्रेस पक्षाचा एक फर्डा प्रवक्ता अशी त्यांची ओळख होती. टीव्ही चॅनल शो, थेट चर्चा आणि विविध व्यासपिठांवरुन राजीव त्याही हे काँग्रेस पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडत.सांगितले जात आहे की, राजीव त्यागी यांची प्रकृती अचानक बिघडली. ते बेशुद्ध झाले. त्यांना त्याच अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

राजीव त्यागी आज सायंकाळी पाच वाजता आज तक या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी होणार होते. स्वत: त्यागी यांनी ट्विट करुन त्याबाबत माहिती दिली होती. राजीव त्यागी यांच्या अचानक जाण्याने राजकीय वर्तुळासह त्यांचे कुटुंबीय आणि सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच काँग्रेस पक्षासह राजकीय वर्तुळातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. (हेही वाचा, कार्डिएक अरेस्ट म्हणजे नेमकं काय? हार्ट अटॅक पेक्षा गंभीर असलेला हा आजार नेमका आहे काय?)

काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते राहुल गांधी आणि प्रियंका गाधी यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून राजीव त्यागी यांना ओळखले जात असे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका प्रसारमाध्यमांकडे मांडण्याची प्रमुख जबाबदारी होती.

राजीव त्यागी यांचे शेवटचे ट्विट

काँग्रेस पक्ष ट्विट

काँग्रेस प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी राजीव त्यागी यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. शेरगिल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझे प्रिय मित्र आणि सहाकारी राजीव त्यागी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मी स्थब्ध झालो आहे. आमच्या परिवारातील एक दोस्त आणि एक चांगला माणूस गमावला. हे त्यांचे जाण्याचे वय नव्हते.

भाजप प्रवक्ते संबित पात्रा ट्विट

दरम्यान, भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनीही राजीव त्यागी यांच्या निधनाबद्ध दु:ख व्यक्त केले आहे. संबित पात्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, काँग्रेस प्रवक्ते आणि माझे मित्र राजीव त्यागी यांचे निधन झाले. विश्वासच बसत नाही. जीवन हे खूपच अनिश्चित आहे. माझ्याकडे व्यक्त होण्यसाठी शब्दच नाहीत.