Arvind Kejariwal And Smriti Irani (Photo Credits: PTI)

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Assembly Elections 2020) मतदानाला आज 8 फेब्रुवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे, या मतदानाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी दिल्लीवासीयांना आवाहन करत मतदान करा असं सांगणारे ट्विट केले होते, यामध्ये महिलांना खास आवाहन करताना केजरीवाल यांनी तुम्ही घराची जबाबदारी सांभाळता तशी दिल्लीची सुद्धा सांभाळा आणि त्यासाठी मतदान करा अश्या आशयाचे ट्विट केले होते. मात्र त्याच्या शेवटी तुम्ही मतदान करताना कोणाला मत देणे योग्य हे ठरेल हे ठरवण्यासाठी पुरुषांशी जरूर चर्चा करा असेही केजरीवाल म्हणाले, हे त्यांचे विधान आता नेमके उलटे पडले असून नेटकऱ्यांकडून यावर नाराजी व्यक्त केली जातेय. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी तर ट्विटवरून केजरीवाल यांचा समाचार घेत, तुम्ही महिलांना इतकेही समर्थ समजत नाही का की त्या स्वतः योग्य उमेदवार निवडू शकतील? असा संतप्त सवाल केला आहे.यावेळी स्मृती यांनी महिला विरोधी केजरीवाल असा हॅशटॅग सुद्धा वापरला आहे.

स्मृती इराणी यांच्या सवालावर केजरीवाल यांनी उत्तर देताना, दिल्लीच्या महिलांनी अगोदरच कोणाला मत द्यायचे हे ठरवले आहे किंबहुना संपूर्ण परिवारांसाठी महिलांनीच निर्णय घेतला आहे अखेरीस त्यांनाच घर चालवायचे असते असे म्हणत आपापली बाजू मांडली आहे. केजरीवाल यांच्या उत्तरावर स्मृती इराण कितपत समाधानी आहेत हे मात्र अद्याप समजलेले नाही.

पहा केजरीवाल यांचे ट्विट

स्मृती इराणी यांचा सवाल

दरम्यान, आज दिल्लीमध्ये 70 विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान घेतले जात आहे, दुपारी 1 वाजेपर्यंत 19.37 टक्के मतदान झाले होते. या सर्व मतांची गणना आणि निकाल 11 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे.