'दिल्लीतील विषारी हवा आणि प्रदूषित पाणी आम्हाला मारत आहे, मग फाशी देण्याची गरज काय?'; निर्भया प्रकरणातील आरोपीचा कोर्टाला सवाल
Death penalty. (Photo Credits: Pixabay, Open Clip Art)

निर्भया प्रकरणातील (Nirbhaya Rape Case) चारही आरोपींच्या फाशीची तयारी सुरु झाली आहे. अशात या चार पैकी एक, अक्षय कुमार सिंग (Akshay Kumar Singh) याने फाशीच्या शिक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका (Review Petition) दाखल केली आहे. निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी अक्षय कुमारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या पुनर्विचार अर्जात, अनेक विचित्र गोष्टींचा उल्लेख केला आहे. याचिकेत म्हटले आहे की दिल्लीतील वायू प्रदूषण सध्या धोकादायक पातळीवर आहे. दिल्ली एका गॅस चेंबरमध्ये परावर्तीत झाली आहे. राजधानी मधील पाणी विषारी बनले आहे. अशा परिस्थितीत आयुर्मान अजूनच घटत आहे त्यामुळे मृत्युदंड देण्याची गरजच काय?

अक्षय कुमारने याचिका दाखल करताना दिल्लीच्या सध्याच्या परिस्थितीचे दाखले दिले आहेत. या दाखल केलेल्या पुनर्विचार अर्जामध्ये वेद पुराण आणि उपनिषदमध्ये हजारो वर्षे लोक जगत असल्याचे नमूद केले आहे. त्रेता युगातही प्रत्येक व्यक्ती हजार वर्षे जगली होती, परंतु या कलयुगात माणसाचे वय 50 वर्षांपर्यंत मर्यादित राहिले आहे, मग फाशीची शिक्षा देण्याची गरजच काय? असा सवाल अक्षयने उपस्थिती केला आहे. दरम्यान कोर्टाने अक्षयला फाशीची शिक्षा सुनावली आहे, ज्याला दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही समर्थन दिले आहे. (हेही वाचा: Delhi Nirbhaya Gang Rape Case: चारही आरोपींना फासावर लटकवले जाणार?)

दिल्लीतील प्रसिद्ध निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना फाशी देण्याबाबत कोणताही आदेश आलेला नसला, तरी तिहार जेल प्रशासनाने फाशीची तयारी सुरू केली आहे. या तयारी अंतर्गत तिहार प्रशासनाने डमीमध्ये 100 किलो वाळू भरून त्याला फाशी दिली. फाशीच्या दोरीला हे वजन पेलेल का नाही हे पाहण्याचा हा प्रयत्न होता. यापूर्वी, 9 फेब्रुवारी 2013 रोजी अफझल गुरूला फाशी देण्यात आली होती. तेव्हाही अशीच डमी चाचणी केली गेली होती.